Root Cause Analysis

मानवी कृतींचा केला एकदा
Root Cause Analysis
म्हटलं मिळवावी PhD
लिहून एखादा Thesis

सर्वप्रथम लिहून काढल्या
मूलभूत प्राकृतिक कृती
श्वसन, निद्रा, प्रात:र्विधी
विनासायास ज्या होती

लागती यत्न ज्यासाठी
स्वसंरक्षण अन्नप्राशन
जीवनचक्र ठेवण्या अबाधित
आवश्यक मग प्रजनन

अन्य कृतींचे असते बहुधा
यापैकी एखादे कारण
जन्म घेई मग नवी संतती
आले करणे पालनपोषण

असो मानव वा असो पशु
होई लागू हे सर्वांसाठी
मानवास पण विशेष दान
मेंदू अन् मन त्या गाठी

मेंदूचा मग त्या करून वापर
केली तयाने क्रांती
अन्न वस्त्र अन् निवाऱ्याची
सोडवली बुध्दीने भ्रांती

मन मात्र तयाचे अजब रसायन
घेइना ते विश्रांती
भय आणि मोहाच्या आहारी
ढळली त्याची शांती
  
भय भविष्यातल्या संकटांचे
अन् गमावण्याचे जे संग्रही
मोह संचयाचा भविष्यासाठी
करण्याकरता बेगमी

भय कष्टप्रद आयुष्याचे
कठीण वृध्दापकाळी
मोह  प्राप्त कराया
ऐषारामी कायम जीवनशैली

भय रोगांचे, बेढबतेचे
अथवा मृत्यूचे अकाली
मोह व्हावे प्राप्त शरीरसौष्ठव
अन् दीर्घायुष्य निरोगी

भय निर्धनतेचे, अपमानाचे
चिरडण्याचेही पायतळी
मोह सत्तेचा, संपत्तीचा
मानमरातबाचा हो बळी

भय पराभवाचे, टीकेचे
अन् होण्याचे अनुत्तीर्ण
मोह विजयाचा, प्रशंसेचा
पदकाचा रजत वा स्वर्ण

भय दु: आणि निराशा
करतील मनाची दुर्गत
मोह आनंदाचा, सुखाचा
होण्याचा मनोरंजनी रत

भय समाज म्हणेल काय
होइल काय लोकमत
मोह प्रतिष्ठेचा, समाजात
अन् वाढावी आपुली पत

भय एकसूरी, चाकोरीमय
जीवनाचे साचेबध्द
मोह साहसाचा, नवीन शिखरे
करण्याचा पदसिध्द

भय प्रारब्धाचे, पापांचे
अन् नरकप्राप्तीचे करे त्राही
मोह खुणवे मोक्षप्राप्तीचा
अथवा जाण्याचा स्वर्गगृही

केला जसजसा विचार
कृतीचा प्रत्येक मी मानवी
मंथनातुनी उलगडली मज
कारणे तीन मूलगामी

गणितातूनी झाली सुटका
समोर मांडतो तुमच्या प्रमेय
मानवी कृतींचे मूळ असे
भूक, मोह अथवा भय

भूक, मोह अथवा भय
जसे की काठी अन् गाजर
कर्माच्या घाण्यास जुंपते
मानव असो वा खेचर

भूक, भय आणि मोह
सगळ्याचे मूळ कारण
त्यामुळेच घडली पुराणे
महाभारत अन् रामायण

जगकल्याणाच्या मोहाने
गीतेचाही झाला उद्गम
निष्काम कर्मयोगाची आपणा
दिली जिने सार्थ शिकवण
  
कळता मजला कारण हे
मी त्यजिला मोह पदवीचा
प्रपंच होता मांडला ज्यास्तव
प्रबंध मोठा लिहिण्याचा

व्यर्थ जावा खटाटोप म्हणोनि
निष्कर्ष कवितेतुनी सादर,
मिळो वा मिळो प्रशंसा,
करितो निर्भय, निर्मोही विद्याधर


२३ एप्रिल २०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip