विचार आधी की शब्द?
विचार आधी की शब्द
जसे कोंबडी नी अंडं
जरा होऊन निस्तब्ध
विचारा मनास
जसा शिशु नवजात
अखिल प्राणीजात
ज्यास भाषा ना ज्ञात
करी कसा विचार
शब्द येती ना भाषा
सांगावी कशी दशा
जळावीण हो मासा
जसा कासावीस
धावून येती हावभाव
आणिक हातपाय
घेई मनाचा ठाव
भाषा नैसर्गिक
नव्हती जेव्हा शब्दभाषा
विचार पोचवती कसा
षडरिपु नवरसा
करून माघ्यम
अविर्भाव अपुरा
पडला संवादा नरा
तेव्हा शब्दांचा झरा
फुटे मेंदूत
झाली तेव्हा उत्क्रांती
वाढे शब्दसंपत्ती
नाही संवादा भ्रांती
माध्यमाची
शब्दांची झाली सरशी
विचार पडले फशी
लागे शब्दांची कुशी
गेले स्वातंत्र्य
विचाराची नाळ
गुंफे शब्दांची माळ
पसरे मायाजाळ
सदैव मनी
ढळे मन:शांती
सर्व संत सांगती
होण्या मोक्षप्राप्ती
व्हावे निर्विचार
सांगतो हठयोग
करा तुम्ही प्रयोग
विचारांचा नियोग
मनी करा
चला मनाशी खेळू
विचार लागती पळू
जसा धावतो वळू
मोकळ्या रानात
शब्द नसता हयात
विचार होते का कह्यात
प्रश्न टाकतो कनात
मनी माझ्या
करून पहा विचार
विना शब्द आधार
वाट पाहे विद्याधर
कळवा तया
२८ जानेवारी २०१६
२८ जानेवारी २०१६
Comments
Post a Comment