कविता रोमॅंटिक

मित्रांनी केली मागणी
लिही कविता रोमॅंटिक
पुरे झाल्या कविता
तुझ्या रूक्ष वैचारिक

बस झाले देणे तुझे
आमच्या डोक्याला ताण
येऊदे कवितेतून थोडे
आता भावनेला उधाण

बसलो लगेच मीही
बाह्या माझ्या सरसावून
तारूण्यातील आठवणी
काढल्या परत खणून

तारूण्याच्या उंबरठ्यावर
होणारा खेळ नजरेचा
होतो आरंभ ज्यातून
प्रवास एकतर्फी प्रेमाचा

प्रवासातील त्या रोमान्स
मांडला मी कवितेतून
लिंग निरपेक्ष अशा
त्रयस्थाच्या भूमिकेतून

पुरूषांना जास्त आणि
स्त्रियांना कमी अधिक
वाटले होते सगळ्यांनाच
करेल कविता नोस्टाल्जिक

आढळला नाही बहुतेक
कोणा त्यात रोमान्स
एकूणच पाहता मिळालेला
कवितेला थंडा रिस्पॉन्स 

केले मग मीच माझ्या
कवितेचे त्या विश्लेषण
प्रथमपुरूषी एकवचनी
हवे होते का ते निरूपण

का पडले शब्द कमी
भावनांची करण्या उकल
रंगवले नाही असहाय
झुरणारे मन विकल

फुलवायला हवा होता का
पिसारा मी मनमोराचा
का होता रंगवायला
चेहरा चित्तचोराचा

बसलो मग मी पुन्हा
कविता तीच मांडायला
पण लागले मन माझे
माझ्याशीच भांडायला

काय लिहिणार वेगळे
झालो मी हतबुध्द
गीतकारांनी केल्यात आधीच
सर्व भावना शब्दबध्द

शेवटी प्रेम म्हणजे प्रेम
म्हणजे प्रेम असतं
पाडगावकर असो वा कोणी
सगळ्यांचं सेम असतं

सोडून दिला अखेर
प्रयत्न हा वांझोटा
रोमॅंटिक कवितांना
देऊन टाकला फाटा

कविता माझी नसली
जरी थोडीही रोमॅंटिक
देतो आश्वासन विद्याधर
ती नेहमीच असेल ऑथेंटिक 

१७ मे २०१६



Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis