झाला कवी एक अभियंता

झाला कवी
एक अभियंता
लिहिल्या त्याने
भरभर कविता

मित्रांनी मग
केला आग्रह
छापून टाक
कविता संग्रह

कवीस पण त्या
पडली चिंता
मिळेल प्रकाशक
वा विक्रेता

जरी मिळाले
दोन्ही समजा
कसा मिळावा
ग्राहक राजा

सुचली मग
तया कल्पना
नेहमी भुलतो
ग्राहक नावीन्या

कविता करण्याचे
लिहून तंत्र
घ्यावे ISO चे
प्रमाणपत्र

लिहिली त्याने
मग प्रक्रिया
सादर करतो
ती मी तया

गाणे एखादे
अथवा कविता
घटना एखादी
किंवा कथा

अनुभव एखादा
अथवा व्यथा
समाजविघातक
एखादी प्रथा

अवखळ सरिता
प्रचंड डोंगर
निळे गगन वा
अथांग सागर

पशुपक्षी वा
फुलांचा बहर
वृक्षवल्ली नि
निसर्ग सुंदर

खट्याळ हास्य
कोमल अधर
गाली खळी वा
नयन मनोहर

बंधन ना कुठल्या
विषयावर
कवितेसाठी
कविमनावर

पडता प्रभाव
खोल मनावर
शब्द भावना
होती अनावर

कवितेचा मनी
रूजे बीजांकुर
सहज उमटती
पंक्ती भराभर

शब्दांची ओसरता
पहिली सर
कविता अडते
काही पंक्तींवर

फिरू लागते
विचारचक्र
रवी घुसळते
जसे तक्र

अवतरते मग
शुभ्र नवनीत
तसे प्रकटती
शब्द सुसंगत

तयार होतो
शेंडा वा बुडखा
स्वरूप घेते
कच्ची कविता

कवितेचे होते
आवर्तन
सुरू होते मग
तिचे संकलन

काट छाट
थोडी फार
शब्दातही
फेर फार

थोडा बदलतो
पंक्तीक्रम
अचूक गाठण्या
कवितेची सम

येते कविता
जेव्हा मनास
अर्पण होते
मग ती जनास

मिळो ना मिळो
ISO चा शिक्का
तुम्हा निर्णयाचा
हा मोका

असेल तुमची
पसंतीची मोहर
कवीस कळवेल
ती विद्याधर
 
२२ फेब्रुवारी २०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis