रात्रीच्या कुशीत
रात्रीच्या कुशीत
जरा विसावता
दिवसभराच्या चक्रातून
होते मुक्तता
जातो थकवा
सैलावतात गात्र
हलक्याने मग
मिटतात नेत्र
शांत होते हळूहळू
मन आणि मुद्रा
ताबा घेते मेंदूची
गाढ निद्रा
घट्ट होत जाते
जशी निद्रेची पकड
दूर होते मनावरच्या
विचारांचे जोखड
मनाची ही अवस्था
टिकत नाही फार
स्वप्नाच्या रंगमंचाचे
हळूच उघडते दार
कोंडलेल्या विचारांना
मिळते मोकळी वाट
नाचवतात पात्रांना
आपल्यासमोर मोकाट
नातलग, सहकारी
आणि मित्रपरिवार
किंवा अनोळखीही
उतरती कलाकार
बहुतेक वेळा असते
आपली प्रमुख भूमिका
नायक वा खलनायक
यात अहमहमिका
स्थळ व काळ
वय किंवा पात्र
कशाचेही नसते
कशाशीच ताळतंत्र
अद्भुत आणि अतर्क्य
घटनांची मालिका
स्वप्नच असण्याचीही जाणीव
मनाच्या पातळीवर एका
पोटात येतो गोळा
परिक्षेच्या दालनात
भलत्याच विषयाची
प्रश्नपत्रिका येता पुढ्यात
कधी तरंगतो हवेत
रस्त्यावर चालता चालता
सर्पांनी आच्छादलेल्या
टेकडीवर चुकतो कधी रस्ता
अगम्य भाषेत
करतो कधी कविता
घोकतो स्वप्नातच
उठल्यावर लक्षात रहाण्याकरता
स्वप्ने पडती कधी जशा
सिंदबादच्या सफरी
जेम्स हेडली चेसची
कधी वाटावी कादंबरी
हिंसा आणि वासनेचा
कधी चालतो नाच नंगा
मनाचा मनाशीच
मग सुरू होतो दंगा
मनी वसे ते स्वप्नी दिसे
असेल जर का खरे
मनातील विचार
मनातच दडलेले बरे
मनाच्या अथांगतेचा
सर्वात मोठा पुरावा
रोज अवतरणारी
ही स्वप्नांची दुनिया
आहेत काही माझे
आप्त आणि परिचित
स्वप्न नाही पडत जया
पडली तर फारच क्वचित
पडतात का स्वप्ने
प्रश्नाचे या मला अप्रूप
जन्मांधळ्यांच्या स्वप्नांचे
काय असेल स्वरूप
असेल तुमच्याकडे
प्रश्नाचे या उत्तर
पाठवा त्याला
वाट पाहे विद्याधर
१४ फेब्रुवारी २०१६
Comments
Post a Comment