शेवटचे पाऊल
निराशेच्या गर्तेत
बुडण्यासाठी मन
बघत नाही असलेली
प्रसिध्दी किंवा धन
शेवटच्या पावलाकरता
काय असते कारण
दिसत नाही का एकही
आशेचा पुसटसा किरण
का होतो हतबल
माणूस परिस्थितीपुढे
नसतात पर्याय की
पडतात प्रयत्न तोकडे
का घेत नाही आधी
आप्तस्वकीयांकडे धाव
की त्यानीच असतो
घातलेला विश्वासावर घाव
का पडतो माणूस
स्वत:च स्वत:च्या नजरेतून
बाहेर येणे होते कठीण
मग निराशेच्या गर्तेतून
होते का असह्य दु:ख
शरीराला वा मनाला
अन रहात नाही
अर्थ अशा जगण्याला
कसा होतो निर्णय
आयुष्य संपवायचा
होत नाही का झगडा
मनाशी मनाचा
परदु:ख असते
नेहमीच शीतल
कसा कळावा परक्याला
दुसऱ्याच्या मनाचा सल
जर आला कधी चुकून
मनामधे अविचार
समजून रोगाचे लक्षण
करा प्रथम मानसोपचार
४ एप्रिल २०१६
Comments
Post a Comment