विज्ञानाचं घोडं

पूर्वीसारखा पाऊस
हल्ली पडत नाही
छत्रीशी आजकाल
फारसे अडत नाही

थंडीचेही काहीसे
झालेय तसेच
स्वेटर घालावा तर भिती
होईल आपले हसेच

उन्हाळ्यात मात्र
जीव होतोय हैराण
वाटू लागते शहरसुध्दा
जसे वाळवंट वैराण

नक्कीच बिघडू लागलाय
निसर्गाचा समतोल
ग्लोबल वाॅर्मिंग म्हणा
किंवा ओझोन होल

काय सोडून जातोय
आपण पाठीमागे वारसा
नवीन पिढीला कसा
वाटावा निसर्गाचा भरवसा

केलं तेवढं नुकसान
नाहीका पुरे झालं
थोडं करूया आता तरी
पुढच्या पिढ्यांचं भलं

लावली नाही झाडं
तरीसुध्दा चालेल
असलेली जगवली
तरीही पृथ्वी तरेल

निसर्गाच्या कलानं
घेऊ आता थोडं
दामटवणं थांबवूया
उद्दाम विज्ञानाचं घोडं

२३/०६/२०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis