एकतर्फी प्रेमकहाणी

तारूण्याच्या उंबरठ्यावर
नजर होती का भिरभिरती
न्याहाळले का चेहरे तुम्ही
वावरणारे अवतीभवती

काही मोजक्या चेहऱ्यांनी
सोडली असेल छाप
बघून कोणाला मनात
आलेही असेल पाप

का होता तुम्ही त्यातले
म्हणती ज्याना पापभिरू
वा होता ध्येयवादी
निश्चयाचे महामेरू

समोर येता काही चेहरे
रस्त्यावर गल्ली बोळी
क्षणिक सुखाची उर्मी
असेल मनी अवतरली

खेळला का अशावेळी
नजरानजरेचा खेळ
रोखून नजर नजरेवर
जमेल तेवढा वेळ

असतील नजरा काही
लगेच वळल्या खाली
असेल नजर कोणाची
जी पुरून तुम्हा उरली

होता का चेहरा त्यातील
एखादा एवढा खास
घेतला असेल ज्याने
ह्रदयाचा तुमच्या घास

बघताक्षणी डोक्यात
वाजली होती का घंटा
किंवा आला विचार
लग्नाचा उफराटा

का चढला हळूहळू
प्रेमाचा तप्त ज्वर
भिनला मनात प्रेमाच्या
बासरीचा मधाळ स्वर

शिजवला का मग तुम्ही
प्रेमाचा पुलाव खयाली
विणली असतील मनी
सुंदर स्वप्नेही मखमाली

मारल्या असतील कितीदा
त्या ठिकाणी तुम्ही चकरा
झाल्या ज्या ठिकाणी
नजरा नजरांच्या टकरा

सोडूनी रोजचा रस्ता
वाट धरली का आडवळणी
बांधलाही असेल मोर्चा
करण्यासाठी टेहळणी

केला होता का त्यानंतर
चेहऱ्याचा त्या पाठलाग
लावण्यासाठी नावाचा,
पत्त्याचा त्याच्या माग

लिहावी चिठ्ठी प्रेमाची
का सरळ सांगावे बेछूट
काय आणि कसे विचारू
केला का काथ्याकूट

एव्हाना होती का तुमची
झोप रात्रीची उडली
नकाराची भीती होती का
घायाळ मनामधे दडली

पायरी मग त्यापुढली
होती का तुम्ही चढली
का हिंमत तुमची होती
त्यासाठी कमी पडली

होकार अथवा नकारही
असेल तुम्हा मिळाला
न विचारताचही तुम्ही
माघारी असाल वळला

काहीही असला जरी शेवट
एकतर्फी या प्रेमकहाणीचा
ह्रदयाच्या एका कप्प्यावर
कब्जा असेल त्या चेहऱ्याचा

१४ मे २०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis