मन आणि आकाश
मन आणि आकाशाचे
असावे घट्ट नाते
असे नेहमीच वाटे
माझ्या मना
जसे मन:पटल
तसे आकाशपटल
दोहोंवरी चाले खेळ
रंगभावनांचा
का नसावी समानता
दोहोंचा जो निर्माता
एकचि तो विधाता
तिथे राज्य करी
चला करु तुलना
पुरे झाली प्रस्तावना
आकाशा आणि मना
पाहू तपासूनी
कधी मनी अंध:कार
रात्री नभ काळेशार
मग आशेची चंद्रकोर
उगवे क्षितीजा
उसळे मनी उल्हास
तमाचा करोनी ऱ्हास
नभी पसरे प्रकाश
जशी पहाटप्रभा
मन उदास उदास
विरहाचा होता भास
सूर्यास्ती जशी नभास
ग्रासे संध्याछाया
कधी मनी उभारी
विचारांची भरारी
जशा आकाशी घारी
घेती उत्तुंग
कधी विना फिकीर
मनी घुमतो स्वर
बगळ्यांची लकेर
जशी फिरे नभी
मनी करे राजवट
कधी भीतीचे सावट
जसे ढग घनदाट
झाकोळती नभा
येई मनी तिडीक
जशी आकाशी वीज
येती त्यामागोमाग
शिव्या गडगडाटी
दु:ख संतापाची कळ
मनी उठतो कल्लोळ
घोंघावते वादळ
जसे व्यापे आभाळा
मन होता मग शांत
जसा होतो अश्रुपात
आभाळीही तद्वत
संथ बरसात
आकाश आणि मनाचे
जपा अतूट हे नाते
मोठे ठेवा आभाळागत
मन करू नका कोते
५ फेब्रुवारी २०१६
Comments
Post a Comment