Uzbekistan Kazakhstan Trip

Day1: 

सकाळी हॅाटेलमधे ब्रेकफास्ट करून निघायची वेळ झाली तेव्हा पावसाने जोर धरलेला. त्यात यान्डेक्स ची टॅक्सी मागवली ती पोचल्याचे अॅपमधे दाखवत होते पण ड्रायव्हर आणि टॅक्सीचा पत्ता नव्हता आणि तो फोनही उचलेना. आमचा प्लान अमीर तिमूर चौकात जायचा होता पण पावसामुळे आणि टॅक्सीच्या फियास्कोमुळे हॅाटेलवाल्याच्या सल्ल्यानुसार चोरसू बाजारात बसने जायचे ठरवले. बस स्टॅाप होटेलसमोरच होता. ३२ नंबरची बस पकडली आणि ताश्कंद दर्शन करत चोरसू बाजारला पोचलो. ही एक मोठी मंडई आहे. भाजीपाला, फळे, मसाले, सुकामेवा, मास मटण इत्यादी पदार्थांचे स्टॅाल मेन बाजारात होते आणि बाहेर तुळशीबागेत ज्या गोष्टी विकत मिळतात त्या गोष्टींचे स्टॅाल होते. तिथे चक्कर मारून आणि आल्यासारखे काहीतरी घ्यायचे म्हणून थोडे आक्रोड आणि जरदाळू घेऊन चोरसू मेट्रो स्टेशन गाठले. तिथून एक लाईन बदलून अमीर तिमूर चौकात पोचलो. एका मोठ्या बागेच्या मधोमध तिमूरचा पुतळा आहे. आपण ज्याला तैमूरलंग म्हणून ओळखतो तोच हा. तिथेच मागे उझबेकिस्तान हॅाटेलची बहुमजली इमारत आहे. इथे थोडा वेळ घालवून मग चालतच आम्ही इंडिपेन्डन्स स्केअरला गेलो. वाटेत दुतर्फा फूड स्टॅाल होते आणि एका बाजूला बाग होती. इंडिपेन्डन्स स्क्वेअरला खूप कारंजी आहेत आणि एक खांबाखांबाना जोडणारे स्ट्रक्चर आहे. तिथून टॅक्सीने मिनॅार मॅास्कला गेलो. मिनॅार मॅास्क हे २०१३ मधे बांधलेले मस्जिद आहे. तिथेच जवळच्या केएफसी मधे फ्रेंच फ्राईज खाऊन तिथून इमाम हजरत मॅास्कला टॅक्सीने गेलो. हा खूप मोठा कॅाम्प्लेक्स आहे. तिथून परत टॅक्सीने इंडिपेन्डन्स स्वेअरला आलो तिथली रोषणाईयुक्त कारंजी बघायला. कारंजी चालू झालेली पण रोषणाई सध्या बंद असल्याचे कळले. थोडा वेळ तिथे घालवून मग ५७ नंबर बसने हॅाटेलवर परतलो. रात्री हॅाटेलजवळ असलेल्या अपेक्स पिझ्झा मधे पिझ्झा खाऊन हॅाटेलवर येऊन सामान घेऊन टॅक्सीने ताश्कंद नॅार्थ रेल्वे स्टेशनला गेलो. तिथून ताश्कंद बुखारा रात्रीची ट्रेन पकडली. रात्री १०ः२३ ला ती वेळेवर सुटली आणि आमच्या कुपेमधे स्लीपर बर्थवर आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो. 















Day 2:

सकाळी ७ः०५ वाजता ठरलेल्या वेळेत ट्रेन बुखारा - १ या कगान येथील बुखारापासून १५ किमी अंतरावरील रेल्वे स्टेशनवर पोचली. तिथून टॅक्सीने हॅाटेलवर पोचलो. चेकइनला खूप वेळ असल्याने सामान ठेऊन आणि फ्रेश होऊन बाहेर पडलो. हॅाटेलपासून पाच मिनिटावरच पुरातन मदरसे, मशिदी, मिनार आणि पाण्याची मोठी कुंडे यांनी भरलेला परिसर होता. सुप्रसिध्द मुल्ला नसरूद्दीन ज्याच्या कथा आणि किस्से लहानपणी वाचले असतील त्याचा गाढवावर बसलेला एक पुतळाही होता. एका बाजूला विविध दुकाने आणि कुंडाभोवती खाद्यपदार्थांचे स्टॅाल आणि ग्राहकांसाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या. अतिशय स्वच्छ आणि रम्य असा हा परिसर आहे. इथे थोडा वेळ घालवून रस्ता ओलांडून पलिकडे असलेल्या अशाच एका भागात गेलो जिथे दुतर्फा कपडे, सुवेनियर्स, विविध हस्तकलेच्या वस्तू  विक्रेत्यांचे स्टॅाल आणि दुकाने होती. त्यापुढे बाहेरून मदरसा किंवा मशिद वाटावी अशी बुटीक हॅाटेल (रहाण्याची) होती आणि त्याही पुढे कालोन मशिद आणि मिनार असलेला कॅाम्प्लेक्स होता. अजूनही बरेच मदरसे या परिसरात होते. हे सर्व बघून व मनसोक्त फिरून साधारण १२ च्या सुमारास आम्ही सकाळी स्टेशनवरून हॅाटेलला येत असताना टॅक्सीचालकाने दाखवलेल्या भारतीय उपहारगृहात इलेक्ट्रिक टॅक्सीने (गोल्फवाले वापरतात तशी) गेलो. पाण्याच्या अभावी उपहारगृह चालू होण्यास अजून तास दीडतास लागेल असे सांगून तिथल्या वेटरने आमच्या भारतीय जेवण करायच्या मनसुब्यावर विरजण घातले. मग तिथेच पायरीवर बसून अजून कुठले भारतीय उपहारगृह आहे का किंवा एखादा पिझ्झेरिया जवळपास आहे का याचा शोध घेतला. आजूबाजूची इतर बर्गर वगैरेची हॅाटेले धुंडाळून झाली होती पण शाकाहारी पर्याय कुठेही उपलब्ध नव्हते. शेवटी चार तास पायपीट केली असल्याने परत दुसरीकडे न जाता तिथेच तासभर वाट बघायचा निर्णय घेतला आणि चौकातल्या वाहनांची रहदारी आणि पदपथावरून ये जा करणारी शाळा, कॅालेजातली मुले, मुली आणि इतर लोकांना न्याहाळण्यात वेळ घालवला. अखेर डाळ रोटी(चपाती) सब्जी राईस अशा साध्याच पण चविष्ट जेवणावर ताव मारून बाहेर असलेल्या सॅाफ्टी विक्रेत्याकडून कोन घेऊन खातखात हॅाटेलमधे परतलो. चेकइन करून हॅाटेल रूम्सचा ताबा घेतला. दोन तीन तास विश्रांती घेऊन हॅाटेलबाहेर पडलो आणि जवळच असलेल्या चोर मिनोर ( चार मिनार) ला भेट दिली. त्यानंतर उरलेली ठिकाणे बघण्यासाठी इलेक्ट्रिक टॅक्सीशी घासाघीस करत असताना त्यातला दोन टॅक्सीवाल्यांची आपापसात बाचाबाची झाली आणि प्रकरण हातघाईवर आलेले बघून आम्ही तिथून काढता पाय घेतला आणि कालोन मिनार परिसरात शिरलो जिथे वाहने जाऊ शकत नाहीत पण थोड्याच वेळात त्या दोन टॅक्सीचालकापैकी एकाने आम्हाला तिथे गाठले तो दुसऱ्या बाजूच्या दारापाशी टॅक्सी ठेऊन आला होता. शेवटी हो नाही करता आम्ही त्याच्या टॅक्सीतून एक तासाचे पैसे ठरवून उरलेले किल्ले, मदरसे, मशिदी वगैरे प्रेक्षणीय स्थळांना धावत्या भेटी दिल्या आणि अखेर मुल्ला नसरूद्दीनच्या पुतळ्यापाशी परतलो. तिथे फुटकळ खरेदीत थोडा वेळ घालवून आठच्या सुमारास परत भारतीय उपहारगृहात गेलो. यावेळी मात्र ते बहुतकरून भारतीय लोकांनी गजबजलेले होते. त्यापैकी एकजण जेवण झाल्यावर आमच्याशी गप्पा मारायला आला. तो आणि त्याच्या ग्रुपमधले सर्वजण आपआपल्या चारचाकी वाहनांनी कुटुंबासहित भारत ते लंडन अशा दोन महिन्यांच्या प्रवासमोहिमेवर निघाले होते. त्याच्याशी आणि त्याच्याबरोबरच्या इतर श्रीमंत साहसवीरांशी गप्पा मारण्यात बराच वेळ गेला ओळखीही निघाल्या. अखेर त्यांचा निरोप घेऊन चालत हॅाटेलवर पोचायला दहा वाजले. माझा रात्री कालोन टॅावरला जाऊन रोषणाईत न्हालेल्या टॅावरची छायाचित्रे घेण्याचा बेत रहित करून निद्रेच्या अधीन झालो.




























Day 3:

आज दुपारी दोननंतर आमची समरकंदला जाणारी ट्रेन होती. त्यामुळे सकाळचे ३-४ तास काल ज्या स्थळांना धावत्या भेटीत उरकले होते त्यापैकी महत्वाच्या स्थळांना भेट द्यायला उपलब्ध होते. आमच्या होटेलच्या जवळ असलेल्या मदरसा कॅाम्प्लेक्सपासून सुरूवात केली. वाटेतल्या तुतीच्या झाडांवरून तुती ओरबाडून मनसोक्त खाल्ल्यानंतर काल संध्याकाळी जिथे रिक्षावाल्याने सोडले होते त्या कालोन मिनाऱ्याची छोटी प्रतिकृती म्हणता येईल अशा मिनाऱ्याला आणि भोवतालच्या मदरशांना भेटी देऊन आम्ही चालतच सिटाडेलपाशी पोचलो. काल बाहेरूनच बघितलेल्या या किल्याला प्रवेश शुल्क होते. ते भरून तासभर आत फेरफटका मारला. पूर्ण बुखारा शहराचे दर्शन इथून घडले. कालोन मिनार परिसराचे मागच्या बाजूने इथे दर्शन घडले. आतल्या बाजूस असलेल्या म्युझियमला धावती भेट देऊन अखेर आम्ही बाहेर पडलो. समोरच असलेल्या मदरशाला भेट देऊन इलेक्ट्रिक टॅक्सीने आम्ही भारतीय रेस्टॅारंटला गेलो. जेवण करून हॅाटेलला परतलो आणि चेकआऊट करून टॅक्सीने बुखारा रेल्वे स्टेशन गाठले. समरकंदसाठी अॅफ्रोसियोब ही हाय स्पीड ट्रेन पकडून साधारण दोन तासाच्या प्रवासानंतर समरकंदला पोचलो. टॅक्सी करून समरकंदच्या हॅाटेलवर गेलो. थोडावेळ विश्रांती घेऊन जवळपास कुठली भारतीय रेस्टॅारंट आहेत याचा गुगलवर शोध घेऊन त्यातील एक निवडले आणि अर्धा तास चालत तिथे जाऊन जेवलो. १५ दिवसापूर्वीच हे सुरू झाल्याचे कळले. जेवण उत्तम होते. जेवणानंतर चालतच रेगिस्तान स्क्वेअरला गेलो. रूंद रस्ते आणि पदपथ आणि पदपथाचा एका बाजूस ओळीत लावलेली फुलांनी डवरलेली रोपे आणि हिरवळ असा अमीर तिमुरचा पुतळा असलेला चौक ते रेगिस्तान स्वेअर हा प्रवास समरकंदबद्दल अतिशय सकारात्मक मत बनवून गेला. रात्र असून एकट्या मुली किंवा फक्त मुलींचे घोळके या रस्त्यावरून निर्धास्त फिरताना पाहून बरे वाटले. रेगिस्तान स्क्वेअरला तीन मदरसे रोषणाईत न्हाऊन निघाले होते. संगीताबरहुकूम रोषणाईत बदल होत होते. हा सोहळा पहायला प्रेक्षक कक्षात पर्यटकांची झुंबड उडाली होती. पुण्यातलेच दोन भाऊ जे पर्यटनार्थ तिथे आलेले त्यांची भेट घडली. गप्पाटप्पा आणि छायाचित्रे काढण्यात दीड दोन तास घालवून टॅक्सी करून हॅाटेलवर परतलो.
















Day 4:

सकाळी हॅाटेलवर भरपेट नाश्ता करून हॅाटेलमधून चेक आऊट केले व सामान तिथेच ठेऊन टॅक्सीने रेगिस्तान स्क्वेअरला गेलो. काल रात्री रोषणाईत बघितलेले मदरसे आज दिवसाच्या टळटळीत उन्हातही छान दिसत होते. छायाचित्रे काढून झाल्यावर फक्त पादचाऱ्यासाठी असलेल्या प्रशस्त मार्गावरून  बिबी खानम मशिदीत गेलो. रस्त्याच्या बाजूला कपडे व इतर वस्तूंची तसेच खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. मशिदीला लागूनच पुढे सिओब बाजार आहे. इथे कपडे, सुका मेवा, फळे, भाजीपाला इत्यादी सर्व प्रकारची दुकाने आहेत. ताश्कंद मधल्या चोरसू बाजाराची आठवण करून देणारा बाजार आहे हा. थोडीफार सुकामेवा व इतर खरेदी आटपून पुढे हजरते खिज्र आणि शाही जिंदा मशिदींना भेट दिली. तिथून काही अंतरावर उलुगबेक ॲाब्जर्वेटरी आहे पण थोडे चालून माघारी शाही जिंदाला परतलो आणि टॅक्सीने अमीर तिमूर मशिदीपाशी गेलो. ही मशिद बघून मग चालत परत रेगिस्तान स्वेअरजवळच्या बागेत गेलो. थोडे वेफर व आईस्क्रीम खाऊन मग टॅक्सीने हॅाटेलवर परतलो. हॅाटेलचे वायफाय वापरून थोडा वेळ तिथे घालवला आणि मग टॅक्सीने ताश्कंदसाठीच्या हायस्पीड ॲफ्रोसियोब ट्रेन पकडण्यासाठी समरकंद स्थानकावर गेलो. या वेळी दीड दोन तासाच्या प्रवासात एक चॅाकलेट, ज्यूस कॅाम्प्लिमेंटरी होते. ताश्कंदला परत टॅक्सीने त्याच हॅाटेलमधे मुक्काम होता. मोठ्या बॅगाही तिथेच ठेवलेल्या. चेकइन करून त्या ताब्यात घेऊन बरोबरच्या सामानासहित रूममधे ठेवल्या. हॅाटेल रिसेप्शनकाऊंटरवरच्या माणसाकरवी उद्या चिमगान माऊंटनसाठी इंग्रजी येणाऱ्या टॅक्सी ड्रायवरची टॅक्सी बुक केली. मग जवळच्याच अपेक्स पिझ्झात पिझ्झा खाऊन हॅाटेलवर परतलो. 














Day 5:

सकाळी नाश्ता करून झाल्यावर हॅाटेलमधून चेकआऊट केले पण सामान तिथेच ठेवले. सांगितल्या वेळेवर इंग्रजी येणारा टॅक्सीचालक टॅक्सी घेऊन हॅाटेलवर हजर झाला. 

आज नेमका पाऊस होता त्यामुळे आजची सफर कशी होणार याबद्दल शंकाच होती. टॅक्सीचालक त्याचे इंग्रजी तितकेसे चांगले नाही म्हणत असला तरी खूप हुशार होता आणि आमच्या आपापसातल्या संभाषणाचा अर्थ नेमका पकडत होता आणि आमचे शंकानिरसन करत होता. एकूणच सर्व परिसराबद्दल आणि उझबेकिस्तानबद्दल त्याचे ज्ञान चांगले होते. तास दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही चिनॅारकेन्ट या केबल कारपाशी पोचलो पण पाऊस असल्याने आणि आजूबाजूचा डोंगराळ परिसर ढगाच्छादित असल्याने आम्ही परतीच्या प्रवासात परिस्थितीप्रमाणे वर जायचे की नाही याचा निर्णय घेऊ असे ठरवून पुढे जायचे ठरवले. या केबलकारपासून थोडेसेच पुढे गेल्यावर एका गावात ८००-८५० वर्ष जुने चिनार वृक्ष आहेत तिथेच पुढे एक धबधबा आहे आणि ४०,००० ते १,००,००० वर्षे जुनी कातळचित्रे (पेट्रोग्लिफ्स) सुध्दा आहेत. हे सर्व बघून आम्ही चार्वाक लेककडे निघालो. चार्वाक लेक हा एका घरणामागचा मोठा जलाशय आहे ज्यात तीन नद्या येऊन मिळतात. अतिशय सुंदर परिसर आहे. त्याच्या काठाला लागून खाजगी बीच रिसॅार्टस् आहेत. प्रवेश शुल्क भरून तिथे जाता येते आणि स्पीडबोट राईड व तत्सम ॲडवेंचर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत पण पाऊस असल्याने तिथे जाण्यात काही हशील नव्हता. इथे आम्हाला दोन पर्याय टॅक्सीचालकाने दिले. एक म्हणजे अमीरसॅाय केबलकारला जाण्याचा जो अजून पुढे होता किंवा आल्या मार्गाने परत जाताना चिनॅारकेन्ट केबल कारची सफर करायचा. जर पुढे गेलो असतो तर दोन तास जास्त लागले असते परतायला. आमची रात्री ८.३० ची अलमाटी फ्लाईट होती. त्यात पाऊसही होता त्यामुळे आम्ही दुसरा पर्याय निवडला आणि परतीच्या वाटेवर चिनॅारकेंट केबलकार पकडून डोंगरमाथ्यावर गेलो. तिथल्या टर्कीश रेस्टोरंटमधे जे मोजके शाकाहाहारी पदार्थ उपलब्ध होते त्यापैकी पिडे हा साधारण मार्गारिटा किंवा चीज पिझ्झ्यासारखा पण चिंचोळ्या आकाराचा पदार्थ खाल्ला आणि तो आवडलाही. एव्हाना पावसाने थोडी उसंत घेतल्याने वरून आजूबाजूच्या डोंगराळ परिसराचे दर्शनही झाले. केबलकारने खाली येऊन परतीचा रस्ता धरला. हॅाटेलवर परतल्यावर सामान घेऊन विमानतळावर गेलो. रात्री ८.३० ची फ्लाईट पकडून १० च्या सुमारास अलमाटीला पोचलो. कस्टम्स, करन्सी आणि सिमकार्ड इत्यादी सोपस्कारात बराच वेळ गेला. यान्डेक्स अॅपवरून टॅक्सी मागवत असताना एक टॅक्सीचालक आला आणि यान्डेक्सच्या भाड्यात हॅाटेलवर सोडतो म्हणाला. उझबेकिस्तानमधल्या ९०% गाड्या शेवरले होत्या आणि गॅसवर चालणाऱ्या होत्या त्यामुळे सामान ठेवायला खूप कमी बूटस्पेस होती. इथे मात्र सर्व कंपन्यांच्या आणि बहुतांश पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या होत्या त्यामुळे चौघांचे सर्व सामान व्यवस्थित मावले. चालक बरीच वर्षे दुबईत राहिला असल्याने त्याला इंग्रजी येत होते. हॅाटेलचा प्रवेश शोधण्यासाठी हॅाटेलच्या ब्लॅाकभोवती एक दोन फेऱ्या माराव्या लागल्या पण चिकाटीने ते शोधून त्याने सुखरूप होटेलमधे सोडले. प्रवासात आम्ही हिंदू की मुस्लिम हा प्रश्न यानेही विचारला आणि भारतातल्या हिंदू मुस्लिम टक्केवारीबद्दलही विचारले. इथल्या हॅाटेलमधे भाड्याव्यतिरिक्त सेफ्टी डिपॅाझिट पण भरावे लागले. पण रात्री उशिरापर्यंत सर्व सोपस्कार आटपून निद्राधीन झालो.











Day 6:

काल रात्री अलमाटीमधे आमचे स्वागत पावसाने झाले असल्याने आजचा दिवस कसा उजाडतो आणी वाया जातो की काय ही धास्ती मनात होती पण बाहेर स्वच्छ ऊन बघून हायसे वाटले. सगळी आन्हिके उरकून आम्ही चालतच अरबाट या वाहनमुक्त रस्त्यावर गेलो. इथे दुतर्फा सर्व तऱ्हेची दुकाने, उपाहारगृहे आणि मॅालही आहे. काही गायक, वादक कलाकार आपली कलाही इथे सादर करतात. इथे एक फेरफटका मारून झाला आणि एक वृध्द (सापेक्ष) बिहारी जोडपे भेटले. जवळपासच्याच एका अपार्टमेंटमधे आठ दहा दिवसाचे बुकिंग करून आले होते. अपार्टमेंट असल्याने रिसेप्शन वगैरे काही भानगड नव्हती त्यामुळे अडीनडीला आणि कुठे कसे फिरायचे याचे मार्गदर्शन करायला कोणीच नव्हते. बाहेर भाषेचा मोठा प्रश्न. स्मार्टफोन वापरायची क्षमता यथातथाच त्यामुळे त्यांची बरीच पंचाईत झाली होती. आम्ही हॅाटेलमधे रहात असूनसुध्दा रिसेप्शनवरच्या लोकांची फारशी काही मदत मिळाली नव्हती कारण त्यांच्याही इंग्रजीची बोंबच. त्या जोडप्याशी थोड्या गप्पाटप्पा आणि मार्गदर्शन झाल्यावर त्यांची रजा घेऊन आम्ही आजूबाजूच्या भारतीय उपाहारगृहाचा आंतरजालावर शोध घेतला आणि अगदी जवळ असलेले पण तरीही महत्प्रयासाने सापडलेले गोपाला गाठले. जेवण झाल्यावर तिथल्या कॅशियर मुलीला चिंबुलक माऊंटनला कसे जायचे हे विचारले. तिने सांगितल्याप्रमाणे समोरच असलेल्या बस स्टॅापवरून १२ नंबरची बस पकडली आणि तासाभराच्या प्रवासानंतर बसच्या शेवटच्या स्टॅापवर उतरलो. एक स्टॅाप अलिकडे केबल कार स्टेशन दिसले होते आणि इकडे उतरायचे की पुढे अशी चलबिचल मनात होती, पण ड्रायवर किंवा इतर प्रवाश्यांना विचारूनसुध्दा त्यांची इंग्रजीची बोंब असल्याने काही उत्तर मिळाले नाही. चढ असल्याने असे ठरवले की जर मागे यावे लागले तर निदान उतार असेल आणि बसमधील कोणीच या स्टॅापवर उतरले नाहीत तामुळे पुढच्या आणि शेवटच्या स्टॅापवर उतरायचा निर्णय घेतला. या स्टॅापपाशी आशियातील सर्वात मोठे स्केटिंग रिंक आहे. इथे पर्यटकांची बरीच गर्दी होती. केबल कारचा कॅरेजेस येजा करताना दिसत होती पण दूर असल्याने त्यात माणसे आहेत का नाही ते दिसत नव्हते. समोरच्या बाजूला वरच्या बाजूला धरण असावे अशी लांबलचक भिंत दिसत होती आणि तिथपर्यंत जायला रस्ता आणि पायऱ्या दिसत होत्या ज्यावर लोकांची वर्दळ होती. पाण्याचा एक प्रवाह तिथून खाली येत होता. त्या प्रवाहावरच्या पुलावर जाऊन आम्ही आधी फोटो काढले आणि इतरांप्रमाणे वर जायचे की नाही असा विचार करत होतो पण त्याआधी केबल कारची चौकशी करावी म्हणून खाली उतरायला सुरूवात केली. वाटेत पोलिस, विक्रेते वगैरे लोकांकडे चौकशीचा प्रयत्न केला पण भाषेच्या अडचणीमुळे तो असफल झाला. तितक्यात दोनतीन गुजराती जोडपी समोरून येताना दिसली. त्यांच्याकडून कळले की केबल कार दुरूस्तीकरता बंद आहे. ते टॅक्सीने आले होते आणि त्यांचा टॅक्सीवाला त्यांना इलेक्ट्रिक टॅक्सीत बसवून देणार आहे वरपर्यंत जायला. वर जाणारा एक रस्ता उजवीकडे होता जिथे खूप इलेक्ट्रिक टॅक्सी उभ्या होत्या पण त्या रस्यावर बॅरिकेड्स होती आणि सुरक्षा रक्षक कोणाला वर सोडत नव्हते कारण त्या रस्त्याचीसुध्दा डागडुजी चालू होती म्हणे. आम्ही तिथल्या दोनचार टॅक्सीवालांशी वर नेण्याकरता चौकशी केली पण कोणीच तयार होईना. इतक्यात बॅरिकेड्स हटवून सुरक्षा रक्षकांनी रस्ता खुला केला आणि आम्ही आधी चौकशी केलेला एक टॅक्सीचालक जायचे का विचारू लागला. पेशाची बोलणी करून आम्ही लगेच टॅक्सीत बसलो आणि वरच्या मार्गाला लागलो. आधी वाटले होते की ती धरणाची भिंतच आपले डेस्टिनेशन आहे पण मग लक्षात आले की ते तर फारच कमी अंतर होते एकूण प्रवासातले. बरेच लोक या रस्यावरून चालत जातानाही दिसले. पण चालत जाण्यासाठी हा खूपच लांबचा पल्ला होता. निदान २-४ तासाचा चढ होता. टॅक्सीने आम्ही अर्ध्या पाऊण तासात वर पोचलो. तिकडे अजून वर बर्फाच्छादित डोंगरावर जाण्यासाठी वेगळी स्किईंगवाल्यांकरता असते तशी ओपन केबल कार होती.   इथे एक मराठी पोरांचे टोळके भेटले. त्यातल्या दोघांशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांनी वर थंडी आहे जॅकेट बरोबर घ्या असा सल्ला दिला. परिसरात थोडी फोटोग्राफी केली आणि केबल कारने वर बर्फात गेलो. अतिशय रम्य परिसर आहे. जॅकेट घालायची गरज भासली. अर्धा पाऊण तास इथे फोटो काढण्यात आणि ग्लेशियर परिसरात फेरफटका मारण्यात घालवून केबल कारने खाली परतलो. तिथून परत इलेक्ट्रिक टॅक्सीने स्केटिंग रिंकपाशी परतलो. १२ नंबरची बस पकडून अलमाटीला परतलो पण आमच्या हॅाटेलजवळच्या बसस्टॅापला पोचायच्या आधीच कोक टोबेला जाणाऱ्या केबल कार स्टेशनपाशी उतरलो. परंतु आत्ताच एवढ्या उंचावरच्या केबल कारने प्रवास करून आल्याने परत केबल कार करून शहरातल्या टेकडीवर जाण्यात काही अर्थ नाही असा निर्णय केला आणि तिथे बसून आईस्क्रीमवर ताव मारता मारता पुढचा प्लान निश्चित केला. अलमाटीमधे बसचे तिकिट माणशी २०० टेंगे म्हणजे साधारण ४० रूपयापेक्षा थोडे कमी आहे. चिंबुलक माऊंटन सोडला तर शहरातल्या बहुतेक प्रेक्षणीय स्थळांची अंतरे कमी आहेत आणी मध्यवर्ती ठिकाणी हॅाटेल असेल तर हॅाटेलपासून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासाकरता टॅक्सीचे ८०० टेंग्यांच्या आसपास किंवा कमीच भाडे होते. यांडेक्स गो ॲपमधे ते आपल्याला आधीच बघताही येते त्यामुळे चारजण असतील तर किंवा दोन जणही असले तरी टॅक्सी जास्त सोयीची ठरते. टॅक्सीने आम्ही प्रथम असेन्शन/झेन्कोव कॅथेड्रलला गेलो. खूप मोठ्या बागेत मधोमध हे रंगीबेरंगी चर्च आहे. चर्चसमोर काही फेरीविक्रेते, घोडेवाले होते. बरीच लहान मुले समोर पालकांच्या निगराणीखाली बागडत होती. चर्चचे दरवाजे बंद दिसले. त्यामुळे फोटो उरकून आणि थोडा वेळ तिथे घालवून तिथून जवळच असलेल्या ग्रीन बाजारला चालत गेलो. हे आपल्या पुण्यातल्या मंडईसारखे एका छताखाली भाजीपाला, फळे, सुकेमेवे, आणि मासमच्छी वाले मार्केट आहे. बाहेरच्या बाजूला मिनी तुळशीबागसदृश कपडे, चप्पल, बूट, खोटे दागिने इत्यादींची दुकाने आहेत. इथे फेरफटका मारून चालतच आम्ही अलमाटी सेंट्रल मॅास्कला गेलो. इथे थोडावेळ घालवला तोपर्यंत अंधारून आले होते. मग भारतीय उपहारगृहांचा शोध घेऊन तंदूरला  टॅक्सीने गेलो. पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारला. इथे किरगिजस्तानातून आलेल्या मेडिकलच्या मराठी विद्यार्थ्यांचा कंपू भेटला. सुट्टी असल्याने ते सर्व अलमाटीतून फ्लाईटने भारतात जायला निघाले होते. त्यांच्याशी अलिकडेच त्यांच्या शहरात झालेल्या स्थानिक आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधे झालेल्या हाणामारीची खबरबात घेतली आणि टॅक्सीने हॅाटेलवर परतलो. संधध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती त्यामुळे उद्याचा दिवस कसा उजाडणार याची चिंता करतच झोपी गेलो. 
































Day 7:

पावसाने कालची चिंता खरी ठरवली. आज त्याने इमाने इतबारे सकाळपासूनच हजेरी लावली. त्यातल्या त्यात एकाच गोष्टीचे समाधान हे की आधी ठरवल्याप्रमाणे आजच्या ऐवजी हवामान बघून कालच चिंबुलक माऊंटनला भेट द्यायचा आम्ही आयत्या वेळेला घेतलेला निर्णय योग्य ठरला. पावसातच चालत चालत अरबाटला गेलो तिथल्या मॅालमधे थोडे विंडो शॅापिंग केले. उद्या दोन  दिवसाच्या चॅरिन कॅनयन, कैंडी आणि कोलसाय लेकच्या टूरवर जायचे ठरवले असल्याने आणि तिथे ज्या साती गावात मुक्काम करावा लागतो तिथे शाकाहारी जेवण मिळणे कठीण असल्याने सोबत ब्रेड बटर किंवा तत्सम काहीतरी पोटभरीचे नेणे आवश्यक होते. तसे भारतातून आणलेले घारगे आणि गुळपोळ्या होत्याच पण जोडीला काहीतरी नेणे आवश्यक होते. त्यामुळे मॅालच्या बेसमेंटमधल्या सुपरस्टोरमधून ब्रेड बटर कोक इत्यादि खरेदी केली आणि हॅाटेलवर परतलो. या वाटेवर असलेले स्पाईस मंत्रा हे भारतीय उपहारगृह हेरून ठेवले. 

हॅाटेलमधे परतल्यावर इन्स्टाग्रामवर स्थानिक टूर्स आणि ट्रॅवल्स कंपन्यांचा शोध घेतला आणि चार पाच जणांशी फोन किंवा वॅाट्स अॅपवर संपर्क साधला. चॅरिन कॅनयन, कॅंडी आणि कोलसाय लेक अशी ठिकाणे दोन दिवसात कवर करणाऱ्यांकडून कोट आणि उपलब्धता दोन्ही मागवले. दुपारचा जेवणाकरता गूगलच्या मदतीने मसाला मॅजिक उपाहारगृहात जायचे ठरवले. अजूनही पाऊस पडतच होता त्यामुळे टॅक्सी करून तिथे गेलो. जेवण झाल्यावर तिथे बाजूलाच परकीय चलनाचे दुकान होते तिथून काही डॅालरचे टेंगे खरेदी केले आणि चालत तिथून जवळच्या मेट्रो स्थानकावर गेलो. तिकिटे काढून मेट्रोने आमच्या हॅाटेलजवळचा स्थानकापाशी उतरलो आणि चालत हॅाटेलवर परतलो. दुपारची वेळ टूर वाल्यांशी बोलून इंग्रजी येणाऱ्या एका ड्रायवरला पक्के करण्यात गेली. दौलत नावाचा ड्रायव्हर स्वतःचीच गाडी घेऊन आम्हाला दोन दिवसाची टूर घडवणार होता. त्याच्या पॅकेजमधे रात्रीच्या हॅाटेलची सोय नव्हती. त्याने आम्हाला ते स्वतंत्रपणे बुक करायला सांगितले. मग आम्ही हॅाटेलची शोधाशोध करून दोन कॅाटेजेस बूक केली. तो दुसऱ्या दिवशी थोडे उशिरा सकाळी १० च्या सुमारास निघूया म्हणत होता सकाळचे ट्रॅफिक टाळण्याकरता. पण हो ना करता ९ वाजता निघायचे ठरले. सगळी दुपार यातच गेली पण बाहेर पाऊस पडत असल्याने नाहीतरी कुठे फिरायला जाणे जिकिरीचेच होते. सकाळी अरबाटला जाताना स्पाईस मंत्रा नावाचे भारतीय उपाहारगृह बघितले होते तिथे रात्रीच्या जेवणाकरता बाहेर पडलो खरे पण ते पुढचे दीडदोन तास बंद ठेवण्यात येणार होते. ४० लोकांचा एक ग्रुप येऊन गेल्याने त्यांना पुन्हा तयारीसाठी वेळ लागणार होता. मग तिथून माघारी फिरलो आणि हॅाटेलच्या उलट्या दिशेला असणाऱ्या दुसऱ्या ईस्टर्न गेट नावाच्या भारतीय उपाहारगृहात चालत गेलो. इथेही एक मोठा ग्रुप येऊन गेल्याचे कळले पण इथे जेवण मिळाले. ठीकठाक होते. त्यांच्या रेटिंगला शोभेसे नव्हते. हॅाटेलवर परतलो आणि पुढची रात्र टूरमधे दुसऱ्या हॅाटेलमधे काढायची असल्याने इथल्या हॅाटेलमधे रूम सोडून एक दिवसाचे पैसे वाचवता येतील का याची चोकशी केली पण ते काही शक्य झाले नाही. या हॅाटेलात तीन तीन रात्रींची दोन वेगवेगळी बुकिंग असे करता यावे म्हणून केलेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उद्या टूरपुरते सामान एका बॅगेत भरले आणि निद्राधीन झालो. 






Day 8:

आजपासून ३ रात्रींचे याच हॅाटेलात वेगळे बुकिंग होते. चेकईन उशिराचे असल्याने सामान रिसेप्शनमधे ठेऊ का असे विचारले असता त्यांनी नवीन रूम्सच्या चाव्याच आमच्या हवाली केल्या आणि सामान तिथे परस्पर हलवायला सांगितले. मग नवीन रूम्सचा ताबा घेऊन सामान तिथे हलवले आणि जुन्या खोल्यातून चेकआऊट करून चाव्या परत केल्या. हे सर्व करेस्तोवर ९ वाजले आणि आमचा ड्रायव्हर ठरल्याप्रमाणे हॅाटेलवर हजर झाला. मग टूरकरता भरलेल्या बॅगा घेऊन आलिशान टोयोटा गाडीत बसलो आणि चॅरिन कॅनयनकडे निघालो. सुरूवातीचा तास दीड तास उजव्या बाजूला हिमाच्छादित पर्वतरांग आमच्या साथीला होती डावी उजवीकडे हिरवीगार शेते आणि खाली छान कॅांक्रिटचा महामार्ग जो सरळ चीनकडे जातो. त्यानंतर मात्र उजवीकडे वळून पर्वतरांगेच्या मागच्या बाजूकडे प्रवास सुरू झाला आणि रस्त्याच्या दुतर्फा वाळवंटसदृश मोकळे माळरान दिसू लागले. थोड्या वेळाने समोर दगडांचे पुंजके / टेकड्या दिसू लागले आणि डावीकडे चॅरिन कॅनयान कडे जाणारा फाटा लागला. हा छान डांबरी पण चिंचोळा रस्ता आम्हाला कॅनयन पर्यंत घेऊन गेला. तिथे एक उपाहारगृह होते आणि बऱ्याच बसेस आणि कार पार्क केलेल्या होत्या. त्यातच गाडी पार्क करून टोप्या आणि पाण्याची बाटली घेऊन आम्ही उतरलो. कॅनयन मुख्यतः  डाव्या बाजूला ३-४ किमी पसरला आहे. त्यापुढे नदी लागते. शंभर एक पायऱ्या उतरून कॅनयनमधे प्रवेश होतो. चालत जायला दुसरा पर्याय म्हणजे खाली ओपन जीप्स आहेत ज्या नदीपर्यंत नेऊन परत आणतात. फक्त एकेरी प्रवासही करता येतो. आम्ही पाऊण तास चालतच गेलो. वाटेत अर्थातच खूप फोटो काढत. लालसर पिवळसर रंगाचे विविधतेने रचले असावेत असे दगड दुतर्फा आणि मधोमध धुळीचा रस्ता, त्यात भर दुपारचे टळटळीत ऊन. मॅकेनास गोल्डची आठवण झाली. नदी पुढच्या प्रवासात वाटेत परत लागते हे माहित असल्याने नदीपर्यंत चालायचे टाळले. माघारी फिरलो आणि पायऱ्या चढून परत वाहनतळापाशी आलो. गाडीत बसून पुढच्या प्रवासास लागलो. खूप भूक लागलेली त्यामुळे बरोबर आणलेल्या घारगे, गुळपोळी इत्यादी खाद्यपदार्थांवर ताव मारला. तेवढ्यातच ब्लॅक कॅनयन आला. इथे काळ्या दगडांच्या कॅनयनमधून नदी वाहते. मग गाडी थांबवून तिथेही फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आता वैराण प्रदेश जाऊन परत हिरवे डोंगर आणि हिमशिखरे दिसायला लागली. थोड्याच वेळात आम्ही साती गावात पोचलो. इथेच आम्ही कॅाटेजेस बुक केली होती. थोडी शोधाशोध करून आम्ही मुक्कामी पोचलो. मालकीण बाईला फोन करून बोलवावे लागले कारण प्रॅापर्टीच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते. खाली लिविंग डायनिंग आणि किचन आणि वर लॅाफ्टवर बेड अशी दोन छोटेखानी पण सुटसुटीत कॅाटेजेस ताब्यात घेऊन सामान ठेवले. ड्रायव्हर च्या प्लानप्रमाणे कॅन्डी आणि कोलसाय दोन्ही लेक उद्या कवर करायचे होते पण पावसाची अनिश्चितता बघता आणि उजेडाचे दोन तीन तास अजून शिल्लक असल्याने आम्ही एक लेक आजच करायचे ठरवले. ड्रायव्हरच्या सल्ल्यानुसार गाडी कोलसायच्या दिशेने निघाली पण कोलसायला तीन लेवलला तीन लेक आहेत. पहिल्या लेकपर्यंत गाडी जाते. तिथे बोटिंगचीही सोय आहे. पुढच्या दोन लेकसाठी ट्रेकिंग करावे लागते. कैंडी त्यामानाने छोटा आणि मधोमध झाडे असलेला सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला लेक आहे. हे सर्व आधी यूट्यूबवर बघितले असल्याने आम्ही कोलसायच्या ऐवजी आज कैंडीला भेट द्यायचे ठरवले आणि गाडी परत फिरवली. कैंडीला साध्या गाड्या जाऊ शकत नाहीत कारण मातीचा आणि खडकाळ रस्ता आहे. वाटेत पाण्याचे प्रवाहसुध्दा ओलांडावे लागतात. त्यामुळे आमची गाडी गावातच ठेऊन आमच्या ड्रायव्हरने गावातल्याच एका फोर व्हील गाडीवाल्याला आणले आणि त्याच्या गाडीतून एका पॅाईंटपर्यंत आणले. लेकला तिथून पायी किंवा घोड्यावरून जायचा मार्ग आहे किंवा अजून दुसऱ्या जीपमधे बसून लेकच्या वरच्या बाजूला जायची सोय आहे. त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. आणि तिथून लेकसाठी खाली उतरून परतताना त्याच पावली जीपपर्यंत चढावे लागते. आम्ही हा जीपचा पर्याय निवडला आणि कैंडी लेकला भेट दिली. सूर्य उतरणीला लागल्याने अर्ध्या लेकवर डोंगराची सावली आणि अर्ध्यावर ऊन अशी परिस्थिती होती. त्यामुळे अर्धा लेक हिरवा पिवळा तर अर्धा लेक गर्द हिरवा निळा अशा छटांमधे सुंदर दिसत होता. अर्धा पाऊण तास लेकपाशी घालवून आम्ही परत उभी चढण चढून जीपपाशी आलो. त्या जीपने खाली पार्क केलेल्या जीपपाशी सोडले आणि त्या जीपने परत साती गावात आणून सोडले. गावातल्या दुकानांमधे डोकावत आणि ब्रेड, बिस्किटे, पाणी वगैरे फुटकळ खरेदी करून आमच्या कॅाटेजेसवर परतलो तोवर अंधारून आले होते. मग कॅाटेजमधले फोल्डिंग डायनिंग टेबल उलगडून ब्रेड बटर जॅम वा लसणीची चटणी अशी सॅंडविचेस तयार करून त्याचा फडशा पाडला. जोडीला बिस्किटे आणि कोल्ड ड्रिंक्सही होतीच आणि महत्वाचे म्हणजे भारतातून बरोबर घेतलेल्या गुळाच्या पोळ्याही. ड्रायवरला सकाळी नऊच्या सुमारास कोलसाय लेकला निघण्याकरता हजर रहा असे बजावले आणि दिवसाची सांगता केली.









































Day 9:

कॅाटेजेसच्या पॅकेजमधे ब्रेकफास्ट सामील होता. मालकीण बाई आठच्या आधीच हजर झाल्या आणि ब्रेकफास्टसाठी काय हवे याची चौकशी करून तयारीला लागल्या. शाकाहारी पदार्थांची एकूणच वानवा त्यामुळे काय द्यायचे याची तिला आणि काय मिळणार याची आम्हाला चिंता. चीज, ब्रेड बटर, कुकीज इत्यादीबरोबर तिने त्यांचा शेकशेक नावाचा एक पारंपारिक गोड पदार्थ बनवून दिला. मधात बुडवलेले पातळ शंकरपाळे असे साधारणपणे त्याचे वर्णन करता येईल. आन्हिके उरकून आणि ब्रेकफास्ट करून ड्रायव्हर ला फोन करून बोलावले. रात्री त्याचा गावातल्या मित्राकडे मुक्काम होता. सगळे सामान गाडीत घालून आमचा लेक कोलसायच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आजूबाजूला हिरवे डोंगर आणि बर्फाच्छादित शिखरे आणि अधूनमधून नदी अशा अतिशय सुंदर परिसरातून हा रस्ता जातो. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही कोलसाय लेकच्या वाहनतळाशी पोचलो. इथे उजवीकडे ओळीने छोटीछोटी बरीच उपहारगृहे आणि दुकाने होती. समोर गेल्यावर खालच्या बाजूला सर्व बाजूंनी डोंगराने वेढलेला अतिशय नयनरम्य आणि कैंडी पेक्षा बराच मोठा कोलसाय लेक पसरला होता. डावीकडे एक लेक फेसिंग मोठे उपहारगृह होते फोटो काढत काढतच आम्ही लेककडे नेणाऱ्या पायऱ्या उतरलो. लेकच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला काठाकाठाने जाण्यासाठी लाकडी रस्ता आहे. उजवीकडचा रस्ता कमी अंतराचा आणि पूर्णपणे उन्हात न्हालेला होता तर डावीकडचा रस्ता जास्त लांबवर पसरलेला आणि सूचिपर्णी झाडांच्या सावलीतून जाणारा होता. बहुतेक लोक उजवीकडचा रस्ता पकडताना दिसले आणि आम्हीही तेच केले. हा रस्ता जिथे संपतो तिथे बऱ्यापैकी माणसे काठावर बसली होती. आम्हीही तिथे बरीच छायाचित्रे काढून थोडा वेळ तिथे स्थानापन्न झालो. नशिबाने आज साथ दिली होती त्यामुळे स्वच्छ हवा आणि उन्हात चमकणारे निळे हिरवे तलावाचे पाणी चारी बाजूंना बर्फाच्छादित शिखरे मिरवणारे हिरवे डोंगर. अतिशय प्रसन्न अशा या वातावरणात तासनतास बसून काढता आले असते. पण आज परतीचा लांबचा प्रवास पुढे करायचा होता. त्यामुळे वेळेचे भान ठेवून रमतगमतच आम्ही पायऱ्या चढून वाहनतळाकडे कूच केले. वाटेत एक मोठा मराठी कंपू भेटला. ठाण्यातला एक परिवार आणि त्यांचे नातेवाईक असे ८-१० जण होते. प्रत्येकी अवघे पाच किलो केबिन लगेज घेऊन हे सगळे मुंबई - अलमाटी या फ्यायएरिस्तान एअरलाईन्सची १२-१५ हजार रूपयांची रिटर्न तिकिटे घेऊन कझाकस्तान फिरायला आले होते. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारून वाहनतळापाशी पोचलो. सकाळी ब्रेकफास्ट केला असल्याने फ्रेंचफ्राय आणि आईस्क्रीम खाऊन अलमाटीचा परतीचा रस्ता धरला. साती गावात थांबून पाणी वगैरे खरेदी करून पुढे निघालो. वाटेत एका गावापाशी आणि पुढे पेट्रोल पंपावर थांबलो. गावात रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाज्या, कपडे, किराणा, खाद्यपदार्थांची दुकाने आणि फेरिवाले माल मांडून बसलेले होते. सफरचंदे, संत्री अशी थोडीफार फळखरेदी केली इथे, आणि पेट्रोल पंपावर वॅनिला कोकचे कॅन. पण इथल्या वॅनिला कोकची चव काही फार आवडली नाही इतरत्र मिळणाऱ्या वॅनिला कोकपेक्षा वेगळीच होती. ही दोन ठिकाणे वगळता कुठे न थांबल्याने आणि शहराबाहेर बऱ्याच वेगाने (१४०-१६०) गाडी पळवल्याने अंधार व्हायच्या आतच अलमाटीला होटेलवर पोचलो. शहरातून बाहेर जाताना जो रस्ता पकडला होता त्याला समांतर अशा डोंगररांगांच्या जास्त जवळून जाणाऱ्या रस्त्याने येताना परतलो. शहराच्या वेशीआधीच रहदारी चुकवण्यासाठी डावीकडे वळून ड्रायव्हरने हा रस्ता गाठला होता. या रस्त्यावर बरीच नावाजलेल्या कार ब्रॅंडची शोरूम्स, काही मॅाल्स आणि विमानतळही होते. हॅाटेलवर परतल्यावर नवीन खोल्यात स्थिरस्थावर झालो आणि थोड्या विश्रांतीनंतर चालत अरबाट मॅालमधल्या पिझ्झा हट मधे गेलो. पिझ्झे चापल्यावर सुपरस्टोरमधे फेरफटका मारला आणि बाहेर पदपथावर कलाकार सादर करत असलेले संगीत ऐकत वेळ घालवून हॅाटेलवर परतलो. 




























Day 10:

आज कोक टोबेला जायचे काल रात्रीच ठरवले होते पण केबल कारने न जाता पायथ्यापर्यंत टॅक्सी/बसने जाऊन टेकडी चढायचे ठरवले होते. त्याप्रमाणे थोडे चालत आणि थोडे बसने पायथ्यापाशी पोचलो. तिथे वर जाण्यासाठी शटलचा पर्याय होता पण आम्ही रमत गमत वर जायचे ठरवले. चांगला डांबरी रस्ता होता पण अर्ध्या भागावर खडी आणि डांबराचा थर द्यायचे काम चालू होते. वाटेत एक विश्रांतीस्थळ होते जिथून पूर्ण शहराचे छान दृश्य दिसत होते. काही छायाचित्रांनंतर उरलेली टेकडी चढून कोक टोबेला पोचलो. बाग, खाद्यपदार्थांचे स्टॅाल, कपडे व सूवेनिअर्स ची दुकाने, उपहारगृह आणि लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ असे काहीसे कायमस्वरूपी जत्रेसारखे कोक टोबेचे वर्णन करता येईल. बीटल्स बॅंडमधील सर्वांचे पुतळे हीसुध्दा कोक टोबेची ओळख आहे. सर्व फिरून आणि छायाचित्रे काढून झाल्यावर एका बाकावर बसून भारतातून आणलेले गुळपोळी, घारगे इत्यादी जे अजूनही शिल्लक होते ते सर्व फस्त केले. मग चालतच टेकडी उतरून शटलच्या स्थानकापर्यंत आलो आणि टॅक्सी करून सेंट्रल पार्कपाशी उतरलो. ही एक प्रचंड मोठी बाग आहे. फुलझाडे, पुतळे, अॅक्वेरियम, प्राणीसंग्रहालय, बोटिंगसाठी तलाव, आणि इतरही बरीच आकर्षणे या बागेत आहेत. खाद्यपदार्थांचे भरपूर स्टॅाल आणि कपडे, सुवेनिअर्सची दुकाने यांचीही इथे रेलचेल आहे. बागेत रमतगमत छायाचित्रे काढत फेरफटका मारून झाल्यावर स्लश ओरपत तलावापाशी थोडा वेळ निवांत बसलो आणि त्यानंतर चालत कॅथेड्रलसाठी निघालो. गेल्या खेपेला ते बंद होते असे वाटल्याने बाहेरूनच बघितले होते म्हणून यावेळेस प्रवेशाची वेळ बघत असताना कळले की जो दरवाजा बंद होता ते प्रवेशद्वार नव्हतेच. आम्ही गेलेलो तेव्हाही ते उघडे होते पण प्रवेशदाराच्या बाजूला आम्ही गेलोच नव्हतो. आतूनही ते बघण्यासारखे आहे त्यामुळे परत भेट द्यायचे ठरवले. यावेळेला ज्या बागेच्या मधोमध ते आहे त्याच्या वेगळ्या बाजूने आम्ही प्रवेश केला आणि ते कुठल्या बाजूला असेल याचा अंदाज बांधून त्या दिशेचा बागेतला मार्ग धरला. पण कॅथेड्रलऐवजी आम्ही २८ पॅन्फिलॅाव गार्ड्समेन मेमोरियलला पोचलो. या ठिकाणाला भेट द्यायचे आमच्या यादीत होतेच ती भेट अनायसेच झाली. इथे काही छायाचित्रे काढून मग कॅथेड्रल गाठले. यावेळी आत जाऊन व्यवस्थित बघितले. मग तिथून जवळच असलेल्या लोट्टे या चॅाकलेट फॅक्टरीपाशी गेलो आणि तिथल्या विक्री केंद्रातून चॅाकलेट खरेदी केली. तिथून टॅक्सी करून स्पाईस मंत्राला गेलो आणि रात्रीचे जेवण उरकून हॅाटेलवर चालत गेलो. 












































Day 11: 

आज अलमाटीतला शेवटचा दिवस. मध्यरात्रीनंतरच्या विमानाने परतीचा प्रवास. गूगलच्या मदतीने अलमाटीतली बघायची राहिलेली प्रेक्षणीय स्थळे धुंडाळली आणि दिवसाची मार्गक्रमणा ठरवली. हॅाटेलमधून चेकआऊट करून सामान तिथेच ठेऊन टॅक्सीने इंडिपेंडन्स स्वेअरला गेलो. तिथे छायाचित्रांचा खुराक झाल्यावर चालतच सेंट्रल स्टेट म्युझियमपाशी गेलो. तिथे वेळ, प्रवेश शुल्क इत्यादीची चौकशी करून दोस्तिक प्लाझा या त्याच्याही पुढे असलेल्या मॅालमधे चालत गेलो. इथे छान मोठे फूड कोर्ट होते. सगळे मेनू तपासून आणि शाकाहारी पदार्थांच्या उपलब्धतेबाबत चौकशी करून डोडो पिझ्झामधे पिझ्झ्याची ॲार्डर दिली आणि इतर कुठून कुठून मिल्कशेक वगैरे मागवले. इथला पिझ्झा उत्तम होता. खाणे झाल्यावर मॅालमधे बराचवेळ दुकाने फिरत रेंगाळलो कारण दिवसभरात म्युझियमव्यतिरिक्त अजून काही बघायचे नव्हते आणि रात्री उशिरापर्यंत वेळ घालवायचा होता. मॅाल फिरून कंटाळल्यावर चालत म्युझियमला गेलो. म्युझियम छान आहे. तिथली सर्व दालने फिरून होईपर्यंत ते बंद व्हायची वेळ झाली. मग बाहेर असलेल्या बागेत बसून गप्पा मारल्या. अंधार व्हायच्या आधी टॅक्सीने अरबाटला गेलो आणि तिथल्या सुपरस्टोरमधे मुख्यतः वेळ घालवला आणि थोडीफार चॅाकलेट्स खरेदी केली. तिथून टॅक्सी करून हॅाटेलजवळच्याच ईस्टर्न गेट उपाहारगृहात गेलो. आमच्यामागोमाग इथे एक मोठा ग्रुप आला. त्यांच्यासाठी बुफे मांडला होता. आम्ही मात्र आम्हाला हवे ते मागवून त्यावर ताव मारला. जेवण आटपल्यावर चालत हॅाटेलवर परतलो. सामान घेतले आणि टॅक्सी करून विमानतळ गाठले. विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांची भाऊगर्दी होती. उरलेसुरले टेंगे शीतपेये आणि आईस्क्रीमवर खर्चून संपवले आणि वेळ झाल्यावर विमानात स्थानापन्न झालो.
















Comments

Popular posts from this blog

Gujarat Road Trip

Root Cause Analysis