Posts

Showing posts from 2017

कधी वाटते मला की

कधी वाटते मला की झेप घ्यावी आकाशी व्याप्ती पृथ्वीची न्याहाळावी जराशी कधी वाटते मला की करावी सलगी जळाशी जलसृष्टी पहावी जाऊन सागराच्या तळाशी कधी वाटते मला की पृथ्वी घालावी पालथी डोंगर दऱ्या पठारे अन् फिरावे शुष्क वाळवंटी कधी वाटते मला की होऊनी वायूवरी स्वार कक्षेतुनी पृथ्वीच्या व्हावे अंतराळी पसार कधी वाटते मला की सूर्याकडे उड्डाण करावे मारूतीप्रमाणे मीसुध्दा अग्निगोलास गिळावे कधी वाटते मला की जगद्व्याप मज आकळावा स्वार्थासवे जीव माझा पंचतत्वी विरघळावा २६/१२/२०१७

साकडे

राहिली न आस काही राहिला न ध्यास आता का राहिला श्वास अजुनी का चालतो छातीचा भाता खुणवती न आव्हाने नवी उसळतो न कधी उल्हास मनी जगण्यात नाही राम आता मग आता मरावे का न मी भूतात मन रमते न आता मन स्वप्ने भविष्याची पाहीना वेळ उठतो खायला पण काळ मजला खाईना घ्यावी समाधि संतांपरी मन ध्यानास एकाग्र होईना जीव लावण्या नुरले कुणी जीव देण्यासही मन धजेना घातले जन्मास ज्याने त्यानेच व्हावे आता पुढे संपवावा अवतार माझा हेचि माझे त्या साकडे १६/१२/२०१७

वेळापत्रक

पावसाने तरी का नेहेमी वेळापत्रक पाळावं कधीतरी अवेळीसुध्दा वाटत असेल कोसळावं तुम्ही आम्हीसुध्दा कुठे पाळतो, वेळ दिलेली उशीराला आठवा बघू किती कारणं पुढे केलेली तुम्हालाही पडला असेलच उशीर पाहुण्यांचा अंगवळणी उगाच कशाला करताय अवेळी पावसाची हेटाळणी राहिलं असेल द्यायचं जलदांचं पावसाळ्यात संचित ठेवायचं नसेल त्याला तुम्हाला पाण्यापासून वंचित पदरात घ्या दान त्याचे कितीही चिंब भिजलात तरी दिलेत जर का शिव्याशाप पुढल्या वर्षी पडेल भारी २२/११/२०१७

रात्रसखी

अनाहूतपणे अवतरतेस बनण्या माझी रात्रसखी उलगडतेस मनाचे पदर सराईत साडीविक्रेत्यासारखी मांडतेस बाजार माझ्यापुढे माझ्याच विविधरंगी भावनांचा कधी मोरपंखी कधी लाल रक्तरंजित कॅलिडोस्कोप जणू काळजाचा मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या हुडकून आणतेस पात्र अन् घटनांना उभा करतेस सुरेख कोलाज् बेमालूमपणे जोडून तुकड्यांना सान्निध्यात तुझ्या सरते निमिषार्धात रात्र गहिरी अन् वेळ निरोपाची येते दिवसाच्या पहिल्या प्रहरी निरोप घेतेस देउन मजला कधी गालावरती खळी दुरावतो कधी तुजला देऊन अस्फुटशी किंकाळी दिवसाला रोज ढकलतो उमलते मग रात्रकलिका अधीरतेने होतो निद्राधीन भेटण्या तुज ‘स्वप्नमालिका’ ०५/१२/२०१७

Come December

सरला नोव्हेंबर, डिसेंबराने टाकलेय पहिले पाऊल पहाटे पहाटे अलगद लागतेय थंडीची चाहूल सूर्यालाही थंडीची या झाली असावी लागण सारून रात्रीची दुलई उशीरानेच झटकतोय किरण शाल धुक्याची पांघरून धरणीही घेतेय लोळण आन्हिकांनाही देते सुट्टी देऊन दवाचे कारण मीही उठेन उशीरा होती मजला ही आशा सूर्याप्रमाणेच अन् मी लवकर गुंडाळेन गाशा बायकोस माझ्या परंतु घड्याळाची या आसक्ती का माझ्याच कपाळी यावी वेळेवर उठण्याची सक्ती ०१/१२/२०१७

संचित सुरांचे

कानातुनी मनाचा संगीत जे ठाव घेते संचित त्या सुरांचे माझ्या मनात वसते माजते मनात जेव्हा विचारांचे दाट रान सोडतो सुटे सुरांना घेतो स्वछंद तान चिंता अडचणींचे उरते मला न भान घालती तनामनाला सूर हे सचैल स्नान आनंदासही सदैव लागते तयांची साथ मित्रांसवे सप्तसूर करती तया द्विगुणित साथ या सुरांची राहो सदैव मजला वय होता म्हणे होतो स्मृतीभ्रंश माणसाला सुरसागरी मी आकंठ अन् तृप्त असावे कान बेसावध अशा क्षणी मृत्यूने घालावे कंठस्नान १५/०७/२०१७

हळवा कोपरा

नवयौवना येणारी समोरी प्रत्येक नसते हूर काही विरळा असे तरूण तो परी ज्याच्या मनी काहूर नाही दोष असे हा तारूण्याचा तरूणाचा काही कसूर नाही काहूरास अनभिज्ञ युवतींच्या नलगे ताकास तूर काही खास असते बघता जिला झंकारतो नवा सूर काही बघता प्रत्येकीला वाजण्या हृदयात वसला संतूर नाही पोचवेल शब्दात भावना अर्थवाही मजकूर नाही भाषा निराळी नजरेची परंतु शब्दांपुढे मजबूर नाही नजरेतुनी कळतो होकार वा प्रस्ताव तिजला मंजूर नाही होकार फुलवी मनी भुईनळे अथवा असा नासूर नाही प्रेमात झाली परिणती वा नियतीस ते मंजूर नाही हृदयात नाही हळवा कोपरा जन्मला अजुनि तो शूर नाही विद्याधर ०९/०६/२०१७

आठवांची रांगोळी

पडतो पहिला पाऊस चिंब भिजते तप्त काया न्हाऊन निघते धरणी उधळते मृद्गंधाचा फाया रिमझिम बरसती सरी फुलतो मनमोरपिसारा येई भरती तशी मनाला सागरा येई दिसता किनारा ऊन आणि पाऊस कधी खेळती शिवाशीव रंगात आला खेळ की रंग ते उतरती इंद्रधनुष्यी रेखीव सरते शिरवे, वाजू लागते टप टप अंगणी पागोळी उठते काहूर व्याकुळल्या मनी उमटते आठवांची रांगोळी ०४/०६/२०१७⁠⁠⁠⁠

दु:ख आणि नियती

केले कितीही खंबीर मना हुंदका तरीही गळी दाटतो फुटला जरी आवाज त्याचा कोलाहल जगाचे त्या काटतो अश्रू आले डोळ्यात कधी पाऊस अवकाळी गाठतो धार डोळ्यातली माझिया धारेत आपुल्या मिसळतो हासलो जरी खुदकन् कधी नशिबास जेव्हा मी कोसतो घडतो विनोद, वाटते जगाला मीही विनोदास त्या हासतो देणार नाही साथ कोणी वाटते का तिजला ही भिती लपवते का दु:खास माझ्या अन् साथ देते ही नियती? २९-०५-२०१७

यमदूत आणि सरकारी नोकर

सरकारी नोकराचा भरला घडा अन फुरफुरला यमाचा रेडा यमाने धाडले यमदूताला उचलून त्याला आणायाला लगबगीने यमदूत पोचला सरकारी त्या कार्यालयाला परंतु होती खुर्ची रिकामी उशीरा यायची होती असामी वाट पाहणे आले नशिबी सगळीच जनता रांगेत उभी वाट पाहण्यात काळ गेला यमदूताच्याच कंठाशी प्राण आला इतक्यात रांगेत हालचाल झाली सावकाश डुलत स्वारी आली आधीच झाला होता उशीर यमदूत झाला होता अधीर गाठले त्याने सरकारी नोकराला घटका भरली कानी पुटपुटला क्षणभर सरकारी नोकर गोंधळला नकळत त्याने आवंढा गिळला सावरले पण क्षणात स्वत:ला यमदूतासमोर प्रस्ताव मांडला कशास फिरतोस रोज वणवण दारोदारी मृत्यूचे घेउनी आमंत्रण रूप स्वत:चे नुरते आत्म्याला सोडले की तयाने मर्त्य या शरीराला ओळखेल कसा चित्रगुप्त तयाला होता मानव वा आणले तू कीटकाला रोज येथे मार तू फेरफटका काढ डुलकी घटका दोन घटका सांग मला आकडा मृत्यूसूचीतला मारेन माशा न चुकता मी तितुक्या प्रस्तावाला या यमदूत पडला बळी सरकारी नोकराची खुलली कळी अडलेली जनता रोज बघते तमाशा सरकारी नोकर बसतो मारत माशा २७-०५-२०१७

तळ्यात मळ्यात

एक काळ होता लोकांना रडताना पाहून हसूच फुटायचं मला मग ते रडू असेल फुटलं बघून एखादी कलाकृती वा खरंच गंभीर असावा मामला तळ्यातून मळ्यात की मळ्यातून तळ्यात मी कधी उडी घेतली कोण जाणे कपोलकल्पित पात्रांचे कपोलकल्पित प्रसंग आजकाल माझ्याही डोळ्यात टचकन अाणतात पाणी परदु:ख शीतल असते असं ऐकून होतो आणि पूर्वी माझं वागणंही होतं सुसंगत आता बेगडी परदु:खानेही वाहतात अश्रू आणि खऱ्या दु:खप्रसंगी मात्र सोडतात साथसंगत मेंदू प्रगल्भ झालाय म्हणावा तर बाळगून तारतम्य कपोलकल्पिताचे आवरायला हवेत अश्रू मन हळवं झालंय म्हणावं तर दु:खप्रसंगी नयन व्हायला हवेत साश्रू काहीच कळेनासं झालय नक्की चुकतंय कोण कोण देतंय त्रास एक तळ्यात एक मळ्यात मेंदू आणि मन दोघांचाही चुकतोय का पदन्यास? २०-०५-२०१७

क्षितिजलालसा

क्षितिज गाठण्या घालती पालथी कितीजण धरणी पोचती तिथेच पुन्हा तरी संपता परी ही गवसणी क्षितिजासम सुंदर भवती पसरली किती निसर्गलेणी पर्वत कानन सरिता सागर पशु पक्षी गाती अन् गाणी आप्त मित्रपरिवारही असे पखरले जणू हिरे अन् मणी होई दुर्लक्ष त्याकडे परंतु गाठणे क्षितिज जे झणी आले आले हाती म्हणता क्षितिज देते की हुलकावणी वणवण उरते केवळ नशिबी अखेर क्षितिज पाजते पाणी हाती आपुल्या करणे सुखकर आपुली जीवन कहाणी मरणानंतर खुशाल नांदा क्षितीजी बनूनी चांदणी २०-०४-२०१७⁠⁠⁠⁠

Entertainement Entertainment Entertainment!

कोहं हा प्रश्न कोणत्याही विचारशील माणसाला  कधी ना कधी छळत असावा असा माझा उगाच एक समज आहे. त्यापाठोपाठ या सृष्टीची निर्मिती कशी झाली, का झाली आणि कोणी केली हेही प्रश्न डोके भंडावून सोडत असणार. काही मोजके लोक या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी अध्यात्माचा तर काही विज्ञानाचा मार्ग स्वीकारतात व आपले पूर्ण आयुष्य खर्ची करतात. तुमच्या आमच्या  सारखे बहुतेक लोक यातल्या एखाद्या वा दोन्ही मार्गासंबंधी वेदवाङ्मयापासून ते आधुनिक विज्ञानग्रंथांचे यथाशक्ती अधून मधून वाचन करून आपापल्या परीने प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतात व त्या दिशेने थोडीफार वाटचाल करून अखेर संतांच्या 'आधी प्रपंच करावा नेटका' या सल्ल्यानुसार या प्रश्नाचा नाद सोडून आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष वळवतात. आता या सांसारिक जबाबदाऱ्या म्हणजे काय तर कुटुंबीयांची काळजी वाहणे. कुटुंबीयांची काळजी वाहणे म्हणजे स्थूलता त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करणे, मुलांचे संगोपन, शिक्षण आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे रा...

कविता

कल्पना अथवा विचार जन्मताच आक्रंदतो तान्हा कवीला फुटतो अचानक पहिल्या शब्दांचा पान्हा येताजाता पडते मुखी मग शब्दामृत निरसं कवितेला हळूहळू चढू लागतं बाळसं शब्दांचंच पाजतो कवी कवितेला बाळकडू रांगणारी तोवर कविता धावू लागते दुडूदुडू वयात येता कविता ठसतो सौंदर्याचा बाज उत्प्रेक्षा अलंकाराचा चढवला जातो साज होते जाणीव जेव्हा कविता झाली उपवर उतावीळ करण्या कवी रसिकांसमोर सादर कवितेचे अन रसिकांचे चिंततो मधुर मनोमिलन नांदा सौख्यभरे हे देऊनी आशीर्वचन वधूपित्यागत पण तो असतो कायम हतबल भविष्य कवितेचे त्या हो खडतर वा हो उज्ज्वल २१-०३-२०१७

ह्रदय की मेंदू

ह्रदयाचा कविंनी फुकाच वाढवला आहे भाव होतो म्हणे ह्रदयातच सर्वथा प्रज्वलित प्रेमभाव ह्रदय आहे केवळ पंप करते जे रक्ताभिसरण सर्व अवयवांप्रमाणे असते मेंदूचेच त्यावरही नियंत्रण मन वसते नक्की कुठे सांगणे आहे फार कठीण एवढे मात्र नक्की मेंदूची अन् त्याची घट्ट वीण बुध्दी आणि भावनेचा होतो मेंदूतूनच प्रकट अविष्कार मन:पटलावर उमटतात परस्परविरोधी विचार पडतो तेव्हा प्रश्न मनाला निर्णय होतो अवघड कधी ठरते बुध्दी अाणि कधी भावना वरचढ मेंदूच करतो मग या निर्णयाची अंमलबजावणी देतो आदेश अवयवांना सोडून त्यांची दावणी अवयव पाळतात आदेश मिळतात जे मेंदूकडून धडधडते जोरात ह्रदय कधी सुजती डोळे रडून बुध्दी घालू पाहते नेहेमी भावनेला आपुल्या आवर बुध्दी असली कितीही प्रभावी भावना विचित्र जनावर युध्द असो वा प्रेम कुणावर बुध्दी करून पाहते बरोबरी भावना मात्र जाणूनही कमजोरी उतावीळ करण्या हाराकिरी बुध्दी असते स्वार्थी कधी अन् उदात्त असते भावना बदलतील आपसात भूमिका कधी याचीही संभावना अंथरूणावरी खिळलेला आप्त जेव्हा सोडतो शेवटचा श्वास असते अपेक्षा फुटेल हुंदका परंतु निघतो सुटकेच...

ती सध्या काय करते

ती होती शेंग चवळी अन बायको भोपळा आहे ती असेल आता सिडनी नशिबी तुझ्या Perth आहे नाही जिचा थांगपत्ता तिच्यास्तव झुरणे व्यर्थ आहे जा विचार अपुल्या सौ ला काय तिजला dearth आहे हौस पुरविण्या तुजला कमविणे अर्थ आहे चाकरी बायकोची करण्या तुझा birth आहे सोडू नको तू उसासा रणी हर एक पार्थ आहे कृष्ण असो व सुदामा ही  गोल earth आहे विसरणे सदाचे तिजला यातच तुझा स्वार्थ आहे बघुनी तगमग तुझिया पत्नीच्या डोळ्यात mirth आहे ती सध्या काय करते बघण्या (तिचा) नवरा समर्थ आहे सुखासीनतेने तिचीही वाढली कमर girth आहे १२/०१/२०१७

अदलाबदली

दु:खात असतो नेहमी माझ्याच मी मश्गुल होतो कावरा बावरा सुख देता जरा चाहूल नेऊ नका हसणे माझे दोस्तहो हसण्यावारी हसतो जास्त, दु:खाची तीव्रता वाढते जेव्हा उरी अश्रू कधी दिसले तुम्हा ओळखा सुखाने गाठले दु:खात झाकोळल्या मनी आभाळ अचानक फाटले येण्याआधी मजपाशी का भेट सुख-दु:खाची घडली कपड्यांची आणि त्यांनी केली असेल अदलाबदली १२/०१/२०१७

आशेची पहाट

हुंदका नसे कुणाचा माझाच दाटला कंठ सागरात मी दु:खाच्या बुडलो आहे आकंठ पडतील रम्य स्वप्ने पाहतो रात्रीची वाट स्वप्नातल्या कळ्यांचा परि फुलण्याआधीच अंत दु:खात रेखले माझे सटवाईने जरी ललाट विसरावी सुखाने का स्वप्नातली वहिवाट फुलतील त्या कळ्या अन् पसरेल घमघमाट उगवेल का कधी ती आशेची सुगंधी पहाट ११/०१/२०१७⁠⁠⁠⁠