कविता

कल्पना अथवा विचार
जन्मताच आक्रंदतो तान्हा
कवीला फुटतो अचानक
पहिल्या शब्दांचा पान्हा

येताजाता पडते मुखी
मग शब्दामृत निरसं
कवितेला हळूहळू
चढू लागतं बाळसं

शब्दांचंच पाजतो कवी
कवितेला बाळकडू
रांगणारी तोवर कविता
धावू लागते दुडूदुडू

वयात येता कविता
ठसतो सौंदर्याचा बाज
उत्प्रेक्षा अलंकाराचा
चढवला जातो साज

होते जाणीव जेव्हा
कविता झाली उपवर
उतावीळ करण्या कवी
रसिकांसमोर सादर

कवितेचे अन रसिकांचे
चिंततो मधुर मनोमिलन
नांदा सौख्यभरे हे
देऊनी आशीर्वचन

वधूपित्यागत पण तो
असतो कायम हतबल
भविष्य कवितेचे त्या
हो खडतर वा हो उज्ज्वल

२१-०३-२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis