ह्रदय की मेंदू

ह्रदयाचा कविंनी फुकाच
वाढवला आहे भाव
होतो म्हणे ह्रदयातच सर्वथा
प्रज्वलित प्रेमभाव

ह्रदय आहे केवळ पंप
करते जे रक्ताभिसरण
सर्व अवयवांप्रमाणे असते
मेंदूचेच त्यावरही नियंत्रण

मन वसते नक्की कुठे
सांगणे आहे फार कठीण
एवढे मात्र नक्की
मेंदूची अन् त्याची घट्ट वीण

बुध्दी आणि भावनेचा होतो
मेंदूतूनच प्रकट अविष्कार
मन:पटलावर उमटतात
परस्परविरोधी विचार

पडतो तेव्हा प्रश्न मनाला
निर्णय होतो अवघड
कधी ठरते बुध्दी अाणि
कधी भावना वरचढ

मेंदूच करतो मग या
निर्णयाची अंमलबजावणी
देतो आदेश अवयवांना
सोडून त्यांची दावणी

अवयव पाळतात आदेश
मिळतात जे मेंदूकडून
धडधडते जोरात ह्रदय
कधी सुजती डोळे रडून

बुध्दी घालू पाहते नेहेमी
भावनेला आपुल्या आवर
बुध्दी असली कितीही प्रभावी
भावना विचित्र जनावर

युध्द असो वा प्रेम कुणावर
बुध्दी करून पाहते बरोबरी
भावना मात्र जाणूनही कमजोरी
उतावीळ करण्या हाराकिरी

बुध्दी असते स्वार्थी कधी
अन् उदात्त असते भावना
बदलतील आपसात भूमिका
कधी याचीही संभावना

अंथरूणावरी खिळलेला आप्त
जेव्हा सोडतो शेवटचा श्वास
असते अपेक्षा फुटेल हुंदका
परंतु निघतो सुटकेचा नि:श्वास

ह्रदयावर आरोप फुकाचा
दगडाशी करतो कवि तुलना
दोष परंतु असे मेंदूचा
तिथेच झगडती बुध्दी भावना

भावना असो वा बुध्दी
चालतो मेंदूचा अंमल त्यावर
म्हणोत कोणी काहीही
मताला ठाम असे विद्याधर

४-३-२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis