रात्रसखी

अनाहूतपणे अवतरतेस
बनण्या माझी रात्रसखी
उलगडतेस मनाचे पदर
सराईत साडीविक्रेत्यासारखी

मांडतेस बाजार माझ्यापुढे
माझ्याच विविधरंगी भावनांचा
कधी मोरपंखी कधी लाल रक्तरंजित
कॅलिडोस्कोप जणू काळजाचा

मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या
हुडकून आणतेस पात्र अन् घटनांना
उभा करतेस सुरेख कोलाज्
बेमालूमपणे जोडून तुकड्यांना

सान्निध्यात तुझ्या सरते
निमिषार्धात रात्र गहिरी
अन् वेळ निरोपाची येते
दिवसाच्या पहिल्या प्रहरी

निरोप घेतेस देउन मजला
कधी गालावरती खळी
दुरावतो कधी तुजला
देऊन अस्फुटशी किंकाळी

दिवसाला रोज ढकलतो
उमलते मग रात्रकलिका
अधीरतेने होतो निद्राधीन
भेटण्या तुज ‘स्वप्नमालिका’

०५/१२/२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis