आठवांची रांगोळी

पडतो पहिला पाऊस
चिंब भिजते तप्त काया
न्हाऊन निघते धरणी
उधळते मृद्गंधाचा फाया

रिमझिम बरसती सरी
फुलतो मनमोरपिसारा
येई भरती तशी मनाला
सागरा येई दिसता किनारा

ऊन आणि पाऊस
कधी खेळती शिवाशीव
रंगात आला खेळ की रंग ते
उतरती इंद्रधनुष्यी रेखीव

सरते शिरवे, वाजू लागते
टप टप अंगणी पागोळी
उठते काहूर व्याकुळल्या मनी
उमटते आठवांची रांगोळी


०४/०६/२०१७⁠⁠⁠⁠

Comments

Popular posts from this blog

Gujarat Road Trip

Uzbekistan Kazakhstan Trip

Root Cause Analysis