तळ्यात मळ्यात

एक काळ होता
लोकांना रडताना पाहून
हसूच फुटायचं मला
मग ते रडू असेल फुटलं
बघून एखादी कलाकृती
वा खरंच गंभीर असावा मामला

तळ्यातून मळ्यात
की मळ्यातून तळ्यात
मी कधी उडी घेतली कोण जाणे
कपोलकल्पित पात्रांचे
कपोलकल्पित प्रसंग
आजकाल माझ्याही डोळ्यात
टचकन अाणतात पाणी

परदु:ख शीतल असते
असं ऐकून होतो
आणि पूर्वी माझं वागणंही
होतं सुसंगत
आता बेगडी परदु:खानेही
वाहतात अश्रू आणि
खऱ्या दु:खप्रसंगी मात्र
सोडतात साथसंगत

मेंदू प्रगल्भ झालाय म्हणावा
तर बाळगून तारतम्य
कपोलकल्पिताचे
आवरायला हवेत अश्रू
मन हळवं झालंय म्हणावं
तर दु:खप्रसंगी नयन
व्हायला हवेत साश्रू

काहीच कळेनासं झालय
नक्की चुकतंय कोण
कोण देतंय त्रास
एक तळ्यात एक मळ्यात
मेंदू आणि मन
दोघांचाही चुकतोय का पदन्यास?


२०-०५-२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis