प्रश्नचिन्ह

वाहतो जन्म घेता मनुष्य
पाप पुण्याच्या पखाली
कुणा पायी काटेकुटे
कुणा गालिचे मखमाली

अपघात म्हणावे याला
की प्रारब्ध जे कपाळी
का गतजन्मीच्या कर्मांची
या म्हणावी मांदियाळी

निर्ममतेने खुडतो पोटची
जो निष्पाप अर्भक कळी
पाप्यास का अशा या
दीर्घायुष्य असावे भाळी

दुराचारी करतो मजा अन्
सदाचारी का घाम गाळी
न्यायाधीश कोण जो चढवे
चोर सोडून संन्याश्या सुळी

का त्याची न्यायव्यवस्था
डोळस असूनही आंधळी
का पसरावा समज जनी
अन् बळी तो कान पिळी

ऐषारामी जीवन जगतो जो
करतो सदा कृत्ये काळी
अठरा विश्वे दारिद्र्यामधे
पिचते जनता साधीभोळी

आहे मनुष्य स्वतंत्र, का
केवळ एक कठपुतळी
सूत्रधाराच्या मर्जीचा तर
नव्हे ना हकनाक तो बळी

संगोपन करतो कोणाचे
अन् कोणा तुडवितो पायदळी
नसेल पर्वा जर रोपाची
बीजारोपण का करतो माळी

का करावी पूजा अर्चना
का उचलावी त्याची तळी
का व्हावे नतमस्तक आणि
का जावे त्याच्या राऊळी

१५-१०-२०१८

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis