सुखाचा क्षण

चौफेर वाळवंट वैराण
उष्म्याने जीव हैराण
इतक्यात येते कुठूनशी
शीतल वाऱ्याची झुळूक
मिळतो सुखाचा एक क्षण
अन् येते तुझी आठवण

हिमालयीन बोचरी थंडी
अंगात भरलीय हुडहुडी
इतक्यात मिळते टपरीतल्या
वाफाळत्या चहाची फुळूक
मिळतो सुखाचा एक क्षण
अन् येते तुझी आठवण

भर समुद्रात भरकटलेलं तारू
उसळत्या लाटा जसा बेभान वारू
इतक्यात येतो दृष्टीक्षेपात
ओळखीचा पल्ल्यातला किनारा
मिळतो सुखाचा एक क्षण
अन् येते तुझी आठवण

मरूभूमीसम मुश्किल डगर
कोसळती दु:खाचे डोंगर
कठीण तरणे हा भवसागर
मन खचलेले शरीर जर्जर
अशात येते तुझी आठवण
तेवढाच सुखाचा एक क्षण

०८-०९-२०१८

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis