न्यूडच्या निमित्ताने ....

नुकताच न्यूड चित्रपट पाहिला. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रींचा अप्रतिम अभिनय आणि चित्रपटाची वास्तवदर्शी हाताळणी याकरता हा चित्रपट सर्वांनी आवर्जून बघावा. पण हे सांगण्याकरता मी हे लिहित नसून या चित्रपटात जे प्रसंग दाखवले आहेत व (माझ्या मते) एकूण जो सूर आहे (उदात्त कलेची व कलाकारांची संकुचित व बुभुक्षित समाज कशी गळचेपी करत आहे) त्यामुळे जे प्रश्न व विचार मनात आले ते तुमच्यासमोर मांडून तुमची प्रतिक्रिया वा मत जाणण्याच्या उद्देशाने लिहित आहे.

न्यूड चित्र (Portrait) काढणे हे कोणत्याही कलाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे असे जर कोणाचे मत असेल (जे. जे. मधे आहे पण बाकी ठिकाणच्या कलाविद्यालयात नाही असे चित्रपटातूनच समजले) तर त्याचे काय कारण आणि त्याने काय साध्य होते ते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. माझे असे स्पष्ट मत आहे की याची काहीही आवश्यकता नाही. शरीराचा कोणताही भाग जर हुबेहुब चित्रात उतरवणे सर्वात कठीण आणि कलाकाराचे कसब पणास लावत असेल तर तो चेहेरा आहे. अनावृत्त शरीराचेच चित्र काढल्यामुळे असे कोणते नवीन वा वेगळे कौशल्य चित्रकार शिकतो? त्याहीपेक्षा जास्त कठीण वेषभूषेतील वा पोषाखातील  बारकावे (नक्षी, रंगसंगती, चुण्या, प्रकाशाचा त्यावरील प्रभाव) चित्रात उतरवणे आहे. असे असताना न्यूड चित्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा अट्टाहास वा आग्रह हा अनाकलनीय आहे.

समजा असे ग्राह्य धरले की खरोखरच न्यूड चित्र काढणे हा कलासंपादनातला एक अतिशय महत्वाचा वा अत्यावश्यक भाग आहे आणि त्याविना कलाशिक्षण अधुरे आहे. मग कलेची चाड असणाऱ्या या मताच्या कलाकारांनी, शिक्षकांनी वा स्वत: विद्यार्थ्यांनी हल्ली न्यूड माॅडेल मिळत नाहीत अशी तक्रार करण्याऐवजी (चित्रपटात खंत व्यक्त करताना दाखवले आहे) स्वत: त्याकरता पुढे येण्यात नक्की कोणती अडचण आहे? कलेशी काडीमात्र संबध नसलेल्या व्यक्तींचा न्यूड चित्रांकरता वापर करणे हे कलास्वातंत्र्याच्या नावाखाली  (खरंतर खाजेखातर) गरजू वा अगतिक व्यक्तींचे शोषणच नाही का? ते स्वत: का नाही कलेकरता हे महान व अत्यावश्यक कार्य करत?

असे चित्र काढण्यामागे त्या व्यक्तीचे शरीर नव्हे तर आत्मा (रूह) चितारणे असा उदात्त विचार सच्च्या कलावंताचा असल्याचा दावाही या चित्रपटात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कलावंताना नक्कीच काही तरी दैवी शक्ती असली पाहिजे की त्यांना नग्न शरीरातच आत्म्याचे दर्शन होत असावे. किंवा अनोळखी व्यक्तीसमोर नग्न उभे रहाण्यामुळे जी अगतिकता किंवा आत्मक्लेश त्या माॅडेलला जाणवत असेल (भारतीय किंवा या चित्रपटातील माॅडेल्स ज्या समाजस्तरातून आलेले दाखवले आहेत त्या संदर्भात) ती चेहऱ्यावर उमटण्याकरता माॅडेलने नग्न होणे आवश्यक असेल. नाहीतरी आपण म्हणतोच ना चेहरा हा मनाचा आरसा असतो!

आता वळूया या प्रकारास अश्लील म्हणून विरोध करणाऱ्या आंदोलक किंवा त्या कलाकाराला थोबाडीत मारणाऱ्या मुलाच्या मानसिकतेकडे. हे बरोबर की चूक अशी कोणतीही भूमिका या चित्रपटात लेखक दिग्दर्शकाने उघडपणे घेतलेली नसली तरी एकूण या विषयावर चित्रपट बनवण्यामागे त्यांचा काय हेतू असावा हे कोणी वेगळे सांगणे नलगे. हा चित्रपट कलाकाराच्या दृष्टीकोनातूनच सादर केला गेला आहे. तसे नसते तर नायिकेच्या शेवटच्या दृष्यानंतर चित्रपट संपायला हवा होता. आता सामान्य माणसाचा दृष्टीकोन बघूया. न्यूड चित्र काढणे आणि प्रतिष्ठित कलादालनात प्रदर्शित करणे हे जर कलेचे स्वातंत्र्य म्हणून मान्य केले तरी हे चित्र अश्लीलतेच्या मापदंडातून बाहेर कसे काढता येईल? जर उद्या एखाद्या छायाचित्रकाराने न्यूड माॅडेल्सच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले अथवा त्याचे मासिक वा पुस्तक प्रकाशित केले तर ते (भारतात) कायदेसंमत होईल का? जर न्यूड चित्र व ते काढणे अश्लीलतेत बसत नसेल तर मग चित्रपटात ती दृश्ये अस्पष्ट का केली गेली आहेत? म्हणजे चित्रपटात जी गोष्ट अश्लील (सेंन्साॅरच्या नियमाप्रमाणे) ती चित्रामधे नाही हा दुहेरी मापदंड कसा काय लावता येईल? का असे म्हणायचे की जो प्रेक्षकवर्ग चित्रे पहायला जातो तो प्रगल्भ आणि आम जनता जी पुस्तक, चित्रपट बघते ती बुभुक्षित आणि बुरसटलेल्या विचारसरणीची? सामान्य जनतेची कपडे घातलेल्या बाईकडे बघणारी नजर वाईट पण न्यूड चित्र काढणारे विद्यार्थी व कलाकार मात्र धुतल्या तांदळाचे असा एकूण या चित्रपटातील अविर्भाव आहे. अशा अर्थाचा संवादही चित्रपटात आहे. एकूणच क्लासिस्ट मनोवृत्ती जी सर्व समाजात रूजलीय तीच कलाकारांमधेही तेवढीच किंवा त्याहूनही तीव्र असल्याचे हा चित्रपट बघितल्यावर जाणवले.

असो! एकूणच समाजातील परिस्थितीबद्दल / मनोवृत्तीबद्दल बरेच भाष्य आणि कारणमीमांसा करता येईल पण आता इथेच थांबवतो.


१२-०५-२०१८

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis