नशा

भक्ती भावे चिंब भिजून
कुणी करतो कुंभ स्नान
पंढरपूरची वारी करतो
कुणी विठुचे घेण्या दर्शन

थंड सागरी पोहून पोहून
कुणी जातो खाडी ओलांडून
धाप लागते तरी धावतो
अर्धी कुणी पुरी मॅरेथाॅन

कुणी मारतो बुडी खोल अन्
सागरतळ काढे खंगाळून
गाठती कुणी उन्नत शिखरे
करून जगभर गिरीभ्रमण

कुणी हरवतो शब्दांमधे अन्
सुरात होई कुणी अंतर्धान
कुणी काढतो चित्रे बहुरंगी
नर्तनात होई कुणी रममाण

अहोरात्र करी कुणी संशोधन
प्रगत होती शास्त्रं, विज्ञान
जोश उत्साह अंगात भरून
कुणी खेळात गाजवी मैदान

कुणी धावतो मिळवण्या धन
जरी ओथंबती घरी रांजण
प्रसिध्दीसाठी करतो कुणी
लटके प्रेम लटकेच भांडण

जीवघेणे त्यांचे कट, कारस्थानं
सत्तेसाठी करतो कुणी राजकारण
गांजलेल्यांना कुणी देतो संजीवन
सेवेसाठी करतो जीवन अर्पण

पशुपक्षी वन्यजीवसंरक्षण
कुणा जगण्या पुरते हे कारण
वनराईचे करण्यासाठी रक्षण
कुणी छेडतो चिपको आंदोलन

प्रत्येकाची दशा वेगळी
प्रत्येकाची दिशा वेगळी
कुणी हसावे कशा कुणाला
प्रत्येकाची नशा वेगळी


२६/०१/२०१९

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis