Posts

Showing posts from July, 2018

न्यूडच्या निमित्ताने ....

नुकताच न्यूड चित्रपट पाहिला. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रींचा अप्रतिम अभिनय आणि चित्रपटाची वास्तवदर्शी हाताळणी याकरता हा चित्रपट सर्वांनी आवर्जून बघावा. पण हे सांगण्याकरता मी हे लिहित नसून या चित्रपटात जे प्रसंग दाखवले आहेत व (माझ्या मते) एकूण जो सूर आहे (उदात्त कलेची व कलाकारांची संकुचित व बुभुक्षित समाज कशी गळचेपी करत आहे) त्यामुळे जे प्रश्न व विचार मनात आले ते तुमच्यासमोर मांडून तुमची प्रतिक्रिया वा मत जाणण्याच्या उद्देशाने लिहित आहे. न्यूड चित्र (Portrait) काढणे हे कोणत्याही कलाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे असे जर कोणाचे मत असेल (जे. जे. मधे आहे पण बाकी ठिकाणच्या कलाविद्यालयात नाही असे चित्रपटातूनच समजले) तर त्याचे काय कारण आणि त्याने काय साध्य होते ते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. माझे असे स्पष्ट मत आहे की याची काहीही आवश्यकता नाही. शरीराचा कोणताही भाग जर हुबेहुब चित्रात उतरवणे सर्वात कठीण आणि कलाकाराचे कसब पणास लावत असेल तर तो चेहेरा आहे. अनावृत्त शरीराचेच चित्र काढल्यामुळे असे कोणते नवीन वा वेगळे कौशल्य चित्रकार शिकतो? त्याहीपेक्षा जास्त कठीण वेषभूषेतील वा पोषाखाती...

वाक्बाण

कधी जाणूनबुजून कधी अनावधानाने घाव घातले किती तीक्ष्ण वाक्बाणाने नरो वा कुंजरो वा ची पुस्ती जोडली त्याने जरी खेळ शब्दांचाच खेळला धर्मही कुरूक्षेत्रावरी धारातीर्थी कुणी कुणी शरपंजरी वाहती बाकी उरी जखमा अश्वत्थाम्यापरी दुर्लक्षूनी फिरती कुणी कुणी घालती फुंकरी वाहतो जखमा किती प्रत्येक आपुल्या अंतरी अनाघ्रात राहिले ना कुणाचे मन जखमा वेदनेचे रणांगण काही नव्या काही पुरातन खपल्या कुठे कुठे जुने व्रण बोलतो मी आता कमी होऊ नका त्याने दु:खी भीती डिवचतील शब्द माझे निद्रिस्त किती ज्वालामुखी ०५-०५-२०१८

सूर आणि सुरा

सुरेत कोणी कोणी सुरात बुडतो आकंठ कोणी कशात भिनते नशा नसानसात दाटतो कंठ आवंढा घशात मैफिलीत रंगते हे सुरसपान आनंदलहरीत हरपते देहभान साधक दोन्ही मार्गिका वेगळी साध्य अंतिम ब्रम्हानंदी टाळी २४-०२-२०१८

स्वयंप्रकाशित

हृदय तुझे करण्या हस्तगत फिरतात चोरासारखे भुरट्या आकर्षणाने तुझ्याभोवती दुष्टग्रह घालती अहोरात्र घिरट्या पिलावळही असते बरोबर असतात अदृष्यसे राहूकेतू अधूनमधून उगवतात अचानक बाहेरगावचे उफराटे धुमकेतू तुला मात्र आहे ठाऊक कशी करायची स्वसुरक्षा ठेवतेस अंतर कायम, त्यांना ओलांडू देत नाहीस कक्षा चंद्राशी तुझी करून तुलना लिहित आहेत तरीही कविता चुकताहेत ते सारे कवि तू तर स्वयंप्रकाशित सविता २९/१२/२०१७