Posts

Showing posts from December, 2017

कधी वाटते मला की

कधी वाटते मला की झेप घ्यावी आकाशी व्याप्ती पृथ्वीची न्याहाळावी जराशी कधी वाटते मला की करावी सलगी जळाशी जलसृष्टी पहावी जाऊन सागराच्या तळाशी कधी वाटते मला की पृथ्वी घालावी पालथी डोंगर दऱ्या पठारे अन् फिरावे शुष्क वाळवंटी कधी वाटते मला की होऊनी वायूवरी स्वार कक्षेतुनी पृथ्वीच्या व्हावे अंतराळी पसार कधी वाटते मला की सूर्याकडे उड्डाण करावे मारूतीप्रमाणे मीसुध्दा अग्निगोलास गिळावे कधी वाटते मला की जगद्व्याप मज आकळावा स्वार्थासवे जीव माझा पंचतत्वी विरघळावा २६/१२/२०१७

साकडे

राहिली न आस काही राहिला न ध्यास आता का राहिला श्वास अजुनी का चालतो छातीचा भाता खुणवती न आव्हाने नवी उसळतो न कधी उल्हास मनी जगण्यात नाही राम आता मग आता मरावे का न मी भूतात मन रमते न आता मन स्वप्ने भविष्याची पाहीना वेळ उठतो खायला पण काळ मजला खाईना घ्यावी समाधि संतांपरी मन ध्यानास एकाग्र होईना जीव लावण्या नुरले कुणी जीव देण्यासही मन धजेना घातले जन्मास ज्याने त्यानेच व्हावे आता पुढे संपवावा अवतार माझा हेचि माझे त्या साकडे १६/१२/२०१७

वेळापत्रक

पावसाने तरी का नेहेमी वेळापत्रक पाळावं कधीतरी अवेळीसुध्दा वाटत असेल कोसळावं तुम्ही आम्हीसुध्दा कुठे पाळतो, वेळ दिलेली उशीराला आठवा बघू किती कारणं पुढे केलेली तुम्हालाही पडला असेलच उशीर पाहुण्यांचा अंगवळणी उगाच कशाला करताय अवेळी पावसाची हेटाळणी राहिलं असेल द्यायचं जलदांचं पावसाळ्यात संचित ठेवायचं नसेल त्याला तुम्हाला पाण्यापासून वंचित पदरात घ्या दान त्याचे कितीही चिंब भिजलात तरी दिलेत जर का शिव्याशाप पुढल्या वर्षी पडेल भारी २२/११/२०१७

रात्रसखी

अनाहूतपणे अवतरतेस बनण्या माझी रात्रसखी उलगडतेस मनाचे पदर सराईत साडीविक्रेत्यासारखी मांडतेस बाजार माझ्यापुढे माझ्याच विविधरंगी भावनांचा कधी मोरपंखी कधी लाल रक्तरंजित कॅलिडोस्कोप जणू काळजाचा मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या हुडकून आणतेस पात्र अन् घटनांना उभा करतेस सुरेख कोलाज् बेमालूमपणे जोडून तुकड्यांना सान्निध्यात तुझ्या सरते निमिषार्धात रात्र गहिरी अन् वेळ निरोपाची येते दिवसाच्या पहिल्या प्रहरी निरोप घेतेस देउन मजला कधी गालावरती खळी दुरावतो कधी तुजला देऊन अस्फुटशी किंकाळी दिवसाला रोज ढकलतो उमलते मग रात्रकलिका अधीरतेने होतो निद्राधीन भेटण्या तुज ‘स्वप्नमालिका’ ०५/१२/२०१७

Come December

सरला नोव्हेंबर, डिसेंबराने टाकलेय पहिले पाऊल पहाटे पहाटे अलगद लागतेय थंडीची चाहूल सूर्यालाही थंडीची या झाली असावी लागण सारून रात्रीची दुलई उशीरानेच झटकतोय किरण शाल धुक्याची पांघरून धरणीही घेतेय लोळण आन्हिकांनाही देते सुट्टी देऊन दवाचे कारण मीही उठेन उशीरा होती मजला ही आशा सूर्याप्रमाणेच अन् मी लवकर गुंडाळेन गाशा बायकोस माझ्या परंतु घड्याळाची या आसक्ती का माझ्याच कपाळी यावी वेळेवर उठण्याची सक्ती ०१/१२/२०१७