Posts

Showing posts from May, 2017

दु:ख आणि नियती

केले कितीही खंबीर मना हुंदका तरीही गळी दाटतो फुटला जरी आवाज त्याचा कोलाहल जगाचे त्या काटतो अश्रू आले डोळ्यात कधी पाऊस अवकाळी गाठतो धार डोळ्यातली माझिया धारेत आपुल्या मिसळतो हासलो जरी खुदकन् कधी नशिबास जेव्हा मी कोसतो घडतो विनोद, वाटते जगाला मीही विनोदास त्या हासतो देणार नाही साथ कोणी वाटते का तिजला ही भिती लपवते का दु:खास माझ्या अन् साथ देते ही नियती? २९-०५-२०१७

यमदूत आणि सरकारी नोकर

सरकारी नोकराचा भरला घडा अन फुरफुरला यमाचा रेडा यमाने धाडले यमदूताला उचलून त्याला आणायाला लगबगीने यमदूत पोचला सरकारी त्या कार्यालयाला परंतु होती खुर्ची रिकामी उशीरा यायची होती असामी वाट पाहणे आले नशिबी सगळीच जनता रांगेत उभी वाट पाहण्यात काळ गेला यमदूताच्याच कंठाशी प्राण आला इतक्यात रांगेत हालचाल झाली सावकाश डुलत स्वारी आली आधीच झाला होता उशीर यमदूत झाला होता अधीर गाठले त्याने सरकारी नोकराला घटका भरली कानी पुटपुटला क्षणभर सरकारी नोकर गोंधळला नकळत त्याने आवंढा गिळला सावरले पण क्षणात स्वत:ला यमदूतासमोर प्रस्ताव मांडला कशास फिरतोस रोज वणवण दारोदारी मृत्यूचे घेउनी आमंत्रण रूप स्वत:चे नुरते आत्म्याला सोडले की तयाने मर्त्य या शरीराला ओळखेल कसा चित्रगुप्त तयाला होता मानव वा आणले तू कीटकाला रोज येथे मार तू फेरफटका काढ डुलकी घटका दोन घटका सांग मला आकडा मृत्यूसूचीतला मारेन माशा न चुकता मी तितुक्या प्रस्तावाला या यमदूत पडला बळी सरकारी नोकराची खुलली कळी अडलेली जनता रोज बघते तमाशा सरकारी नोकर बसतो मारत माशा २७-०५-२०१७

तळ्यात मळ्यात

एक काळ होता लोकांना रडताना पाहून हसूच फुटायचं मला मग ते रडू असेल फुटलं बघून एखादी कलाकृती वा खरंच गंभीर असावा मामला तळ्यातून मळ्यात की मळ्यातून तळ्यात मी कधी उडी घेतली कोण जाणे कपोलकल्पित पात्रांचे कपोलकल्पित प्रसंग आजकाल माझ्याही डोळ्यात टचकन अाणतात पाणी परदु:ख शीतल असते असं ऐकून होतो आणि पूर्वी माझं वागणंही होतं सुसंगत आता बेगडी परदु:खानेही वाहतात अश्रू आणि खऱ्या दु:खप्रसंगी मात्र सोडतात साथसंगत मेंदू प्रगल्भ झालाय म्हणावा तर बाळगून तारतम्य कपोलकल्पिताचे आवरायला हवेत अश्रू मन हळवं झालंय म्हणावं तर दु:खप्रसंगी नयन व्हायला हवेत साश्रू काहीच कळेनासं झालय नक्की चुकतंय कोण कोण देतंय त्रास एक तळ्यात एक मळ्यात मेंदू आणि मन दोघांचाही चुकतोय का पदन्यास? २०-०५-२०१७

क्षितिजलालसा

क्षितिज गाठण्या घालती पालथी कितीजण धरणी पोचती तिथेच पुन्हा तरी संपता परी ही गवसणी क्षितिजासम सुंदर भवती पसरली किती निसर्गलेणी पर्वत कानन सरिता सागर पशु पक्षी गाती अन् गाणी आप्त मित्रपरिवारही असे पखरले जणू हिरे अन् मणी होई दुर्लक्ष त्याकडे परंतु गाठणे क्षितिज जे झणी आले आले हाती म्हणता क्षितिज देते की हुलकावणी वणवण उरते केवळ नशिबी अखेर क्षितिज पाजते पाणी हाती आपुल्या करणे सुखकर आपुली जीवन कहाणी मरणानंतर खुशाल नांदा क्षितीजी बनूनी चांदणी २०-०४-२०१७⁠⁠⁠⁠