घाई नको बाई अशी

सकाळी मित्रमंडळीसमवेत टेकडीवर किंवा इतरत्र फिरण्याचा व्यायाम आणि त्यानंतर एखाद्या हॉटेलमधे चहानाश्ता या रविवारच्या रूटीनला बऱ्याच वेळा उशीर होतो आणि मग नवराबायकोत जो संवाद होतो तो या द्वंद्वगीतात शब्दबध्द करायचा प्रयत्न केलाय!


बायको:

घाई करा बाई घरी
येण्याची वेळ झाली
जाईल हो माघारी
बघुनी ती कुलूप दारी

होता उशीर कामे सारी
पडतील तिची माझ्या उरी
करूनि दोन्ही तंगड्या वरी
पसराल तुम्ही कोचावरी

नवरा:

घाई नको बाई अशी
माघारी जाईल कशी
पकडू तिला शेजारी
होऊ नको वेडीपिशी

मित्रमंडळी जमली खाशी
चार घास उतरू दे घशी
त्यावर चहाची कपबशी
धर तोवर धीर जराशी

बायको:

रमता तुम्ही मित्रांपाशी
डबक्यात जशा डुंबती म्हशी
निघणार नाही पाय तुमचा
दिल्याशिवाय काठीने ढुशी

सौदा माझा तुमची खुशी
तरी पाडता मला तोंडघशी
मदत मागता शिंकते माशी
नेहमीचीच तुमची मखलाशी

नवरा:

भीक नको तोंड आवर
जाऊ चल घरी सत्वर
तक्रारीला वाव नको
पोचवतो तुज वेळेवर

जरी समजा झाला ऊशीर
बाई असेल परतली जर
आलिया भोगासी विनातक्रार
होइन मी स्वत:हून सादर


०६/११/२०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis