दुःख दुचाकी

काल पहाटे मित्रांसंगे
सायकलीस मी दामटले
तीन तासांनी परतलो लंगडत
बायको म्हणाली काय घडले


आता सांगू कसा बोलू कसा
दोष कुणाला देऊ कसा
पडलो मीच आग्रहास बळी
अन् कुठुनी आठवली अवदसा


किलीमांजारो जमला असता
पोचलो असतो जसातसा
युरोप सायकलिंग करण्या नव्हता
माझा माझ्यावर भरवसा


किलीमांजारोला आडवा आला
गुडघा माझा हा दुखरा
मित्र म्हणाले सायकलिंगला
नसतो गुडघ्याचा नखरा


डॉक्टर मित्रांनी दिला दुजोरा
सर्वांनीच केला आग्रह
बायकोनेही देता परवानगी
तोडला मनाचा मी निग्रह


सायकलिंगचे निमित्त केवळ
लोभ मित्रांच्या संगतीचा
केला नाही विचार मग मी
फारसा मागचा वा पुढचा


काढून टाकले त्वरित ऑनलाईन 
नॉनरिफंडेबल एअर तिकिट
नव्हते वाटले सरावामधेच
उडेल माझी त्रेधातिरपिट


अर्धसत्य गुडघ्याचे सांगितले
मित्र निघाले माझे हुशार
मांड्या आणि पोटऱ्यां विषयी
शब्द काढला नाही चकार


पिरंगुटच्या पहिल्या खेपेतच
सर्व स्नायु झाले ताठर
पर्याय नाही आता विद्याधर
आलिया भोगासी व्हावे सादर



१७/०८/२०१६

Comments

Popular posts from this blog

Gujarat Road Trip

Uzbekistan Kazakhstan Trip

Root Cause Analysis