आयुष्याचं कोडं

काय करावं आयुष्याचं
उलगडत नाही कोडं
पन्नाशीत सुध्दा कळतं
चुकलंय गणित थोडं

आवडत नसली तरी
जुंपतो नोकरीच्या घाण्याला
कोणतंही कारण
पडतं पुरं बहाण्याला

पुढे केली जाते चिंता
कसं होईल उदरभरण
कसं परवडावं आणि
मुलांचं उच्च शिक्षण

पैसा असला कितीही
जमवलेला गाठी
वाटत नाही पुरेसा
आपल्याच हव्यासापोटी

आवडनिवड छंद वगैरे
सारले जातात बाजूला
झापड लावून धावतो पैशामागे
ठेवून गहाण बुध्दीला

कातडी जरी झाली जाड
खाऊन चाबकाचा मारा
खचत जाते तब्येत
सोसून मनाचा कोंडमारा

थांबून क्षणभर कधीतरी
घ्यावा थोडासा आढावा
मार्ग पुढील आयुष्याचा
पुन्हा एकदा आखावा

सगळेच धावतात म्हणून
आपण धावणे सोडूया
जमेल जेवढे लवकर
तेव्हढे स्वच्छंद जगूया

११/०७/२०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis