Posts

Showing posts from June, 2017

हळवा कोपरा

नवयौवना येणारी समोरी प्रत्येक नसते हूर काही विरळा असे तरूण तो परी ज्याच्या मनी काहूर नाही दोष असे हा तारूण्याचा तरूणाचा काही कसूर नाही काहूरास अनभिज्ञ युवतींच्या नलगे ताकास तूर काही खास असते बघता जिला झंकारतो नवा सूर काही बघता प्रत्येकीला वाजण्या हृदयात वसला संतूर नाही पोचवेल शब्दात भावना अर्थवाही मजकूर नाही भाषा निराळी नजरेची परंतु शब्दांपुढे मजबूर नाही नजरेतुनी कळतो होकार वा प्रस्ताव तिजला मंजूर नाही होकार फुलवी मनी भुईनळे अथवा असा नासूर नाही प्रेमात झाली परिणती वा नियतीस ते मंजूर नाही हृदयात नाही हळवा कोपरा जन्मला अजुनि तो शूर नाही विद्याधर ०९/०६/२०१७

आठवांची रांगोळी

पडतो पहिला पाऊस चिंब भिजते तप्त काया न्हाऊन निघते धरणी उधळते मृद्गंधाचा फाया रिमझिम बरसती सरी फुलतो मनमोरपिसारा येई भरती तशी मनाला सागरा येई दिसता किनारा ऊन आणि पाऊस कधी खेळती शिवाशीव रंगात आला खेळ की रंग ते उतरती इंद्रधनुष्यी रेखीव सरते शिरवे, वाजू लागते टप टप अंगणी पागोळी उठते काहूर व्याकुळल्या मनी उमटते आठवांची रांगोळी ०४/०६/२०१७⁠⁠⁠⁠