Posts

Showing posts from November, 2016

घाई नको बाई अशी

सकाळी मित्रमंडळीसमवेत टेकडीवर किंवा इतरत्र फिरण्याचा व्यायाम आणि त्यानंतर एखाद्या हॉटेलमधे चहानाश्ता या रविवारच्या रूटीनला बऱ्याच वेळा उशीर होतो आणि मग नवराबायकोत जो संवाद होतो तो या द्वंद्वगीतात शब्दबध्द करायचा प्रयत्न केलाय! बायको: घाई करा बाई घरी येण्याची वेळ झाली जाईल हो माघारी बघुनी ती कुलूप दारी होता उशीर कामे सारी पडतील तिची माझ्या उरी करूनि दोन्ही तंगड्या वरी पसराल तुम्ही कोचावरी नवरा: घाई नको बाई अशी माघारी जाईल कशी पकडू तिला शेजारी होऊ नको वेडीपिशी मित्रमंडळी जमली खाशी चार घास उतरू दे घशी त्यावर चहाची कपबशी धर तोवर धीर जराशी बायको: रमता तुम्ही मित्रांपाशी डबक्यात जशा डुंबती म्हशी निघणार नाही पाय तुमचा दिल्याशिवाय काठीने ढुशी सौदा माझा तुमची खुशी तरी पाडता मला तोंडघशी मदत मागता शिंकते माशी नेहमीचीच तुमची मखलाशी नवरा: भीक नको तोंड आवर जाऊ चल घरी सत्वर तक्रारीला वाव नको पोचवतो तुज वेळेवर जरी समजा झाला ऊशीर बाई असेल परतली जर आलिया भोगासी विनातक्रार होइन मी स्वत:हून सादर ०६/११/२०१६

एक दुचाकी द्या मज आणुनी

केशवसुतांच्या  एक तुतारी द्या मज आणून चे विडंबन एक दुचाकी द्या मज आणुनी हाकीन जी मी स्व:पायाने घालेन पालथी सारी धरणी दीर्घ तिच्यावरच्या रपेटीने अशी दुचाकी द्या मजलागुनि पळेल सुसाट जी रस्त्यावरूनि गियर बदलुनी लोण्यावाणी चढणीलाही पाजेल पाणी गाड्या जाऊ द्या मरणालागुनि वापर त्यांचा पुसुनी टाका धूर ओकती ज्या भकाभका सावध ऐका धरणीच्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक दुचाकी द्या मज आणुनी प्राप्तकाल हा विशाल भूधर नको तया प्रदूषणाची बाधा निजनामे त्या वरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करूनि ह्या गाड्यांवर शुरांनो या त्वरा करा रे धरणी चा ध्वज उंच धरा रे नीती ची द्वाही फिरवा रे दुचाकीच्या या चाकांबरोबर १८/१०/२०१६